
धरणांच्या सर्वेक्षणासाठी राऊत यांच्याकडून निधी
धरणांच्या सर्वेक्षणासाठी राऊतांमुळे निधी
कणकवली ः हरकुळ ब्रुदुक जिल्हा परिषद मतदासंघामध्ये लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत धरण कामांच्या सर्वेक्षण विंधन विवरांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार विनायक राऊत आणि नवनिर्वाचित शिवसेना जिल्हा प्रमुख (ठाकरे गट) सतीश सावंत यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. हरकुळ ब्रुदुक जिल्हा परिषद मतदासंघामध्ये लघु पाटबंधारे योजना अंतर्गत धरण कामांच्या सर्वेक्षण विंधन विवरांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार श्री. राऊत यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. सतीश सावंत यांनी ही याबाबत पाठपुरावा केला आहे. याअंर्तगत करंजे तेलीवाडी येथील धरण कामांच्या सर्वेक्षण विंधन विवरांसाठी २० लाख ९० हजार रूपये, भिरवंडे हेल्याचे सखलसाठी सर्वेक्षण विंधन विवरांसाठी २० लाख ८८ हजार, हरकुळ खुर्द धरण कामाच्या सर्वेक्षण विंधन विवरांसाठी २७ लाख ४६ हजार, हरकुळ ब्रुदुक धरण कामाच्या सर्वेक्षण विंधन विवरांसाठी २७ लाख ५० हजार निधी उपलब्ध झाला आहे.
---
कासव महोत्सवाचे वेंगुर्लेत आयोजन
वेंगुर्ले ः सावंतवाडी वन विभागाच्यावतीने २५ आणि २६ मार्च या कालावधीत वायंगणी बीच (ता.वेंगुर्ले) येथे ‘कासव महोत्सव वायंगणी २०२३’चे आयोजन केले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सिंधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार आदी उपस्थित राहणार आहेत. कासव महोत्सवात २५ ला नवजात समुद्री कासव पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडणे, मांडवीखाडी येथे कांदळवन सफर, कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शन, कासवमित्रांचा सन्मान, कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शनपर चित्रफीत, कांदळवन कक्षाच्या दुर्गा ठिगळे यांचे मार्गदर्शन, ‘कूर्म अवतार’ दशावतार नाट्यप्रयोग, २६ ला नवजात समुद्री कासव पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडणे, स्वच्छता मोहीम, कोंडुरा डोंगरावर नेचर ट्रेल होणार आहे.
-----------------
पिंगुळीत कबड्डी स्पर्धेचे आयोजन
कुडाळ ः पिंगुळी-गुढीपूर येथील श्री गणेश क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व नेहरू युवा केंद्र (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ मार्चला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा खुला व लहान अशा दोन गटात पिंगुळी-गुढीपूर बसथांबा नजीकच्या मैदानावर होणार आहे. प्रथम ७,७७७, द्वितीय ५,५५५ व प्रत्येकी चषक, अष्टपैलू खेळाडू ७७७, उत्कृष्ट चढाई व पकड़ ५५५ रुपये व प्रत्येकी चषक, लहान गट मुलगे (१ जानेवारी २००६ नंतर जन्मलेले) प्रथम ३,३३३, द्वितीय २,२२२ रुपये व प्रत्येकी चषक, अष्टपैलू खेळाडू ५०१, उत्कृष्ट चढाई व पकड प्रत्येकी ३०१ रुपये व चषक अशी पारितोषिके आहेत. प्रत्येक सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडूची निवड करून भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा.
------
कडावल वाचनालयास पुस्तके भेट
कुडाळ ः मुंबई येथे राहणारे प्रा. शिरिष पाटील (निवृत्त प्राचार्य, शारीरिक शिक्षण प्रशिक्षण संस्था, मुंबई मनपा शिक्षण विभाग) यांनी कडावल वाचनालयास आपल्या संग्रहातील १९.३५८ रुपये किंमतीची ग्रंथसंपदा देणगी दाखल सुपूर्द केली. पाटील यांनी ग्रामीण भागातील वाचकांसाठी दाखविलेल्या या आत्मीयतेबद्दल वाचनालयाने त्यांचे आभार मानले. त्यांनी यापूर्वीही पांग्रड व भडगाव हायस्कूलसाठी ‘साधना’चे दिवाळी अंकाच्या प्रत्येकी वीस प्रती मुलांसाठी दिल्या होत्या. त्यांना ग्रामीण भागातील मुलांविषयी, शाळांविषयी व येथे मराठी भाषा संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नांबाबत आत्मीयता आहे.
--
‘कौशल्य विकास’अंतर्गत आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२२-२३ साठी स्किल इंडिया पोर्टल व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्याकडे सूचीबद्ध असलेल्या संस्थांमार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी तत्काळ प्रशिक्षण संस्थेकडे संपर्क करून नावनोंदणी करावी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
................
शिक्षकांमुळे आजीला मिळाली ‘सावली’
मालवण ः कट्टा (ता.मालवण) येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. कट्टा बाजारपेठेत भाजी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या आजींना सावलीसाठी मोठी छत्री देऊन त्यांना मदतीचा हात दिला. शिक्षकांच्या या समाजाभिमुख कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.