
कणकवलीत उद्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
90204
कणकवली ः स्वागतयात्रेची माहिती देताना गुरूप्रसाद गणपते, मृणाल ठाकूर, नंदू आरोलकर, प्रतिभा करंबेळकर, संदीप राणे आदी.
कणकवलीत उद्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
गुरूप्रसाद ठाकूर; वेशभूषा, ध्वजपथक, वारकरी दिंडीचे आयोजन
कणकवली,ता. २० ः हिंदू नववर्ष आणि चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचे औचित्य साधून हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने येथे स्वागत यात्रेचे आयोजन केले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदा सायंकाळी चारला छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी (ता.२२) ही स्वागत यात्रा निघणार आहे, अशी माहिती यात्रा समितीचे प्रतिनिधी गुरूप्रसाद ठाकूर यांनी आज दिली.
येथील उत्कर्ष हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला यात्रा समितीचे सदस्या प्रतिभा करंबेळकर, मृणाल ठाकूर, हरीष गणपते, नंदू आरोलकर, संदीप राणे आदी उपस्थित होते. श्री. ठाकूर म्हणाले, ‘‘हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गतवर्षी शोभायात्रा काढली होती. त्याचप्रमाणे यंदा बुधवारी (ता.२२) सायंकाळी चारला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या स्वागत शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. ही शोभायात्रा पटवर्धन चौकातून ढालकाटी ते कणकवली महाविद्यालयाच्या शिवारा मंदिर येथे सायंकाळी सहाला संपेल. यंदाच्या शोभायात्रेची सुरुवात ही एक तरुण हातात गुढी उभी करून प्रारंभ करणार आहे. नववर्षाचे स्वागत कमान, महिलांची दुचाकी रॅली, ढोल पथक, ट्रॅक्टर ट्रॉलीवर भारत मातेचा देखावा, पालखी तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीवर देवतांचे तरंग असतील. सनातन परिवाराचे सदस्य यामध्ये सहभागी होणार आहेत. एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर कोकणातील दशावतार कलाकार विविध वेशभुषेमध्ये असतील. या स्वागत यात्रेमध्ये धनगरी गजा नृत्यही सादर केले जाईल. तसेच गुजराती महिला हिंदू वेषामध्ये नृत्य सादर करतील. महिलांची ढोल पथके यात सहभागी होणार आहेत. शहरातील पदर प्रतिष्ठानतर्फे महिला या स्वागत यात्रेत सहभागी होतील. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बैलगाड्या ही या स्वागत यात्रेत सहभागी असणार आहेत. नववर्ष स्वागत यात्रेचा समारोप महाविद्यालयाच्या पटांगणावर होईल. यावेळी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा संस्कृती याविषयी विवेक मुतालीक हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.