
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार पाटील, गावकर यांना जाहीर
90240
टी. के. पाटील, विजय गावकर
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
पाटील, गावकर यांना जाहीर
ओरोस, ता. २० ः बॅ. नाथ पै सेवांगण कट्टातर्फे प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले. हि. भा. वरसकर विद्यालय, वराडचे मुख्याध्यापक टी. के. पाटील व भ. ता. चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय गावकर यांना प्रा. मधू दंडवते स्मृती आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कारांचे वितरण शनिवारी (ता. २५) दुपारी तीनला कट्टा शाखा कार्यालयात करण्यात येणार आहे.
टी. के. पाटील यांनी हि. भा. वरसकर विद्यालय, वराड हायस्कूलमध्ये गेली १५ वर्षे मुख्याध्यापक आहेत. एक विज्ञाननिष्ठ शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. अनेक शैक्षणिक संस्था, शिक्षक संमेलनात, विद्यार्थी मेळाव्यात त्यांनी विज्ञान व गणित या दोन विषयांचे मार्गदर्शन केले आहे. वराड हायस्कूलमध्ये ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करणे तसेच संस्था व पालकांच्या सहकार्याने इमारत उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शिक्षक संघटन, पतसंस्था यामध्येही पदाधिकारी म्हणून प्रामाणिकपणे काम केले. विजय गावकर यांनी गणित विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून तालुका जिल्हा व राज्य स्तरावर मार्गदर्शन केले आहे. पतसंस्था तसेच शिक्षक संघटनेवर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम करतानाच सेवांगण कट्टाच्या मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गास विनामूल्य मार्गदर्शन केले आहे. या कार्याचा गौरव करण्यासाठी वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक व काळसे हायस्कूलचे मुख्याध्यापक पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व अॅड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सेवांगण कट्टा येथे त्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन किशोर शिरोडकर, शाम पावसकर, दीपक भोगटे, विकास म्हाडगुत, बापू तळावडेकर, वैष्णवी लाड यांनी केले आहे.