थेट शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

थेट शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

90265
सावंतवाडी: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करताना ठाकरे युवा सेनेचे पदाधिकारी व बेरोजगार डीएड धारक. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

थेट शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

डी.एड्. बेरोजगार प्रश्न; सावंतवाडीत ठाकरे गट युवासेना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः जिल्ह्यातील स्थानिक डी.एड् धारकांना जिल्ह्याच्या शिक्षण विभागात रिक्त असलेल्या जागी नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी आज ठाकरे युवासेनेने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडले. पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना किंवा यंत्रणेला कोणतीही कल्पना न देता डी.एड् झालेल्या युवकांनी मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी आंदोलन केले. स्थानिक डी.एड् धारकांना तसेच स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, अशा घोषणा देत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. पोलिसांना य़ाची माहिती मिळताच तत्काळ केसरकर यांच्या निवासस्थानाकडे कुमक पाठविण्यात आली. त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनामध्ये कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, वेंगुर्ले तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, दोडामार्ग तालुकाप्रमुख मदन राणे, युवासेना समन्वयक गुणाजी गावडे आदींसह संदीप म्हाडेश्वर, राजू गवंडे, सागर भोगटे, रुपेश खडपकर, मनीष तोटकेकर, गुरू गडकर आदी डी.एड् बेरोजगारांचा समावेश होता. युवा सेना जिल्हाध्यक्ष शिरसाट म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील डी.एड् धारकांना न्याय मिळण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधत राहू.’’
---
न्याय मिळेपर्यंत माघार नाही
श्री. धुरी म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील शिक्षण विभागामध्ये सद्यस्थितीत ९०० पदे रिक्त आहेत; मात्र असे असले तरी रिक्त पदी भरती करून घेत येथील बेरोजगार डी.एड् धारकांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करावे लागले. जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून २००७ ला झालेल्या भरतीमध्ये स्थानिकांनाच नोकऱ्या मिळाल्या होत्या. त्याच पद्धतीने यापुढे होणारी भरती व्हावी. जेणेकरून येथील बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत कितीही गुन्हे अंगावर झेलण्यास मागे हटणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com