
चिपळूण-चिपळुणात 75 टक्के थकीत कर वसुलीचे आदेश
चिपळुणात ७५ टक्के थकीत कर वसुलीचे आदेश
पालिकेची वीस पथके तैनात ; अन्यथा विकास निधीवर टाच
चिपळूण, ता. २० ः थकीत कर वसुलीसाठी आता शासनाकडूनच चिपळूण पालिका प्रशासनावर दबाव वाढू लागला आहे. आर्थिक वर्ष अखेर असल्याने किमान ७५ टक्के थकबाकीची रक्कम वसुल करण्याचे आदेश मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना देण्यात आले आहे. ही वसुली न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच पालिकेला शासनाकडून देण्यात येणाऱ्या १५ व्या वित्त आयोगासह अन्य विकास निधीला टाच लावण्याचा इशारा देण्यात आल आहे. यामुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली असून कर वसुलीसाठी शहरात वीस पथके तैनात करीत मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
३१ मार्चपर्यंत शासनाने पालिकेला कमीत कमी ७५ टक्के वसुली करण्याची अट घातली आहे. इतकी वसुली न झाल्यास मुख्याधिकारी, कर अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासह १५व्या वित्त आयोगाचा निधी न देण्याबाबतचे परिपत्रक यापूर्वी दिले आहे. असे असताना आता नवे परिपत्रक आले असून दिलेले उद्दिष्ट पार न केल्यास विकास निधीलाही टाच देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता वसुलीचा वेग वाढवण्यात आला आहे. वसुलीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची २० पथके तैनात केली असून सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्येक पथकाने किती वसुली करावी याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत मालमत्ता करातून ९ कोटी ५० लाखाची वसुली झाली असून अजूनही ४ कोटी ३० लाख रुपये वसुली बाकी आहे. ५४ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामालकांकडून ७० लाख रुपये वसुली बाकी आहे. तसेच १ कोटी १२ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली असून अजून ९७ लाख रुपयांची वसुली बाकी आहे. ९४ जणांची नळकनेक्शन तोडण्यात आली असून त्यांच्याकडून २० लाख रुपये येणे आहे.
चौकट
घंटागाडीवर झळकणार थकबाकीदारांची नावे
शहरात पालिकेने कर वसुलीसाठी जप्तीची धडक मोहीम हाती घेतली आहे. तरीही अनेक थकबाकीदार कराची रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता अशा थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांबरोबरच शहरात फिरणाऱ्या घंटागाड्यांवरही लावण्याचा नवा फंडा प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे. तशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.