
पावस-पावस बाजारपेठमार्गे एसटी पुन्हा बंद
पावस बाजारपेठमार्गे एसटी पुन्हा बंद
खासगी वाहनचालकांची अरेरावी; कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन कार्यवाही
पावस, ता. २० ः पावस बाजारपेठेतील प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता एसटी महामंडळाने बाजारपेठमार्गे एसटी सेवा प्रायोगिक तत्वावर पुन्हा सुरू केली होती. परंतू खासगी वाहनचालकांच्या दादागिरीनंतर एसटी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याने एसटी महामंडळाने पावस बाजारपेठमार्गे एसटी सेवा पुन्हा बंद केली आहे.
दोन वर्षे कोरोनामुळे एसटी सेवा बाजारपेठमार्गे बंद होती. या मार्गावरील गोळप मोहल्ला परिसरात अरुंद रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्यामुळे एसटी वाहतुकीला अडचण निर्माण होत होती. त्यामुळे कोरोनानंतरही एसटी सुरू झाली नव्हती. अखेर स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनंतर एसटी महामंडळाने ठराविक फेऱ्या सुरू केल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात नागरिक, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु अरुंद रस्त्यावर स्थानिक वाहन चालकांनी एसटीच्या चालक, वाहकांशी भांडणतंटा केल्यामुळे आगार प्रमुखांनी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता व इतर प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन बाजारपेठमार्गे एसटी वाहतूक बंद केली आहे.
यासंदर्भात पावस बसस्थानक प्रमुख श्री. टापरे म्हणाले, ‘सायंकाळी पाचच्या सुमारास पावस बाजारपेठमार्गे एसटीची गाडी येत असताना तिथे एका टेम्पोचालकाने गाडी आडवी घालून रस्ता अडविला. त्यानंतर त्याने चालक व वाहकाशी हुज्जत घातली. याबाबत चालकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचालकाला पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर गाड्या बंद होणार म्हणून लोकांनी लोकप्रतिनिधींना फोन केला. अखेर त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण थांबले. परंतु वारंवार असे घडत राहल्यास चालक व प्रवासी यांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजारपेठमार्गे एसटी बंद करण्यात आली.