पान पाच मेन-मांगेलीत वीज परस्पर खंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान पाच मेन-मांगेलीत वीज परस्पर खंडित
पान पाच मेन-मांगेलीत वीज परस्पर खंडित

पान पाच मेन-मांगेलीत वीज परस्पर खंडित

sakal_logo
By

पान पाच मेन

मांगेलीत वीज परस्पर खंडित
ग्रामस्थ हैराण ः महावितरणही प्रकाराबाबत अंधारात
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २० ः महावितरण विभागाला कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज सेवा परस्पर खंडित करण्याचा प्रकार मांगेली गावात गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. उन्हाळ्यात उष्णतेच्या दिवसांत ग्रामस्थ हैराण झाले आहेत. नेट सेवा देणाऱ्या ठेकेदाराकडून हा प्रकार होत असल्याचा आरोप करीत सर्व नियम धाब्यावर बसवून ''हम करे सो कायदा'' या प्रमाणे वावरणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी उध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केली.
सध्या दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. उष्णतेनेही उच्चांक गाठला आहे. या रगरगत्या उष्णतेच्या चटक्यांनी जनता हैराण झाली आहे. असे असताना मांगेलीसारख्या दुर्गम भागात नेट सेवा देणाऱ्या ठेकेदाराचे वेगळेच उपद्व्याप सुरू आहेत. आपल्या मर्जीला येईल तेव्हा विद्युत विभागाला कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत प्रवाह बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे मांगेली गावातील जनता वारंवार विद्युत प्रवाह खंडित होत असल्याने हैराण झाली आहे. ही माहिती ग्रामस्थांनी उध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख धुरी यांच्या कानी घातली. याबाबत धुरी यांनी सहाय्यक अभियंता गुरुप्रसाद मोरे यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार उघड केला. अशा ठेकेदारांच्या मनमानी कामकाजामुळे सर्वांचे हाल होत आहेत. उष्णतेच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित होता कामा नये. यासाठी मनमानी काम करणाऱ्या ठेकेदारावर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी धुरी यांनी केली आहे.

मांगेली गावात नेट सेवा देण्यासाठी लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदाराने एक दिवस विद्युत प्रवाह बंद ठेवण्यासंदर्भात बोलणी केली होती. शासकीय काम असल्याने फक्त एकच दिवस विद्युत प्रवाह बंद करण्यास परवानगी दिली होती; मात्र त्यानंतर गेले तीन दिवस विद्युत प्रवाह बंद होत असल्याचे धुरी यांनी उघडकीस आणून दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराला विद्युत प्रवाह बंद करण्यापासून थांबविण्यात आले. जे काम असेल ते महावितरण जेव्हा दुरुस्ती करणार, त्या दिवसांत करून घेण्यास सांगितले आहे.
- गुरुप्रसाद मोरे, सहाय्यक अभियंता