‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ प्रेरणादायी ठरेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ प्रेरणादायी ठरेल
‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ प्रेरणादायी ठरेल

‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ प्रेरणादायी ठरेल

sakal_logo
By

90300
कणकवली : ‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ पुस्तकाचे प्रकाशन करताना कमल परुळेकर. शेजारी सतीश लळीत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. महेंद्र नाटेकर, उपाध्यक्ष सतीश लळीत, सचिव व स्मृतिग्रंथाच्या संपादक डॉ. सई लळीत आदी.

‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ प्रेरणादायी ठरेल

कमल परुळेकर; कणकवलीत स्मृतिदिनी पुस्तक प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २० ः शिक्षण, समाजकारण, पर्यावरण, राजकारण अशा विविध क्षेत्रांत प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केलेल्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी ‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या कार्याचे हे दस्तावेजीकरण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका कमल परुळेकर यांनी येथे केले.
प्रा. नाटेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘माधुरी-महेंद्र प्रतिष्ठान’ने तयार केलेल्या ‘नाटेकर सर स्मृतिग्रंथा’चे प्रकाशन श्रीमती परुळेकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. महेंद्र नाटेकर, उपाध्यक्ष सतीश लळीत, सचिव व स्मृतिग्रंथाच्या संपादक डॉ. सई लळीत उपस्थित होत्या. कणकवली केंद्रशाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रा. नाटेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
श्रीमती परुळेकर म्हणाल्या, ‘‘प्रा. नाटेकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. शैक्षणिक क्षेत्र हे त्यांचे प्राधान्यक्षेत्र असले तरी त्यांनी त्याच ताकदीने समाजकारण आणि राजकारणही केले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उत्तुंग आहे. विद्यादानाबरोबरच शैक्षणिक ग्रंथलेखनही त्यांनी केले. जिल्हा आणि राज्य स्तरावर त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. ते विशिष्ट ध्येयाने राजकीय क्षेत्रात उतरले. अनेक निवडणुका लढविल्या. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीसाठी संघर्ष समिती स्थापन करून मोठे आंदोलन उभे केले. वृक्ष लागवड आणि पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी वृक्षमित्र सेवा संघाची स्थापना केली. निवृत्तीनंतर निवृत्तांच्या समस्या सोडविण्यासाठी अथक काम केले. कणकवली तालुका सेवानिवृत्त संघटनेची स्वत:ची वास्तू त्यांनी स्वत: आर्थिक झळ सोसून उभारली.’’
प्रास्ताविकात सतीश लळीत यांनी स्मृतीग्रंथ प्रकाशित करण्यामागची भुमिका स्पष्ट केली. नाटेकर यांचे विविधांगी कार्य एकत्रित करुन त्याचे दस्तावेजीकरण करणे, पुढील पिढ्यांपर्यंत त्यांचे कार्य पोचवणे, यासाठी हा स्मृतिग्रंथ तयार केला आहे. नाटेकरांच्या संपर्कात जी माणसे आली, त्यांना ते कसे भावले, हे लेखकांच्या शब्दांमधून वाचकांना वाचायला मिळेल, असे ते म्हणाले. संपादक डॉ. सई लळीत म्हणाल्या की, माझ्या दृष्टीने नाटेकर हे केवळ माझे बाबा नव्हते, त्यांच्यात एक समाजवत्सल माणूस दडला होता. अन्यायाविरुद्ध ते पेटून उठत असत. पुस्तकात २८ लेख समाविष्ट केले आहेत. यात सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, पत्रकार, विद्यार्थ्यांच्या लेखांचा समावेश आहे.’’
.............
चौकट
प्रा. नाटेकरांचे जीवन संघर्षमय
प्रा. नाटेकर यांना दूरदृष्टी होती. कोकण विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. कोकणातील नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढवायचे असेल, तर बांबू लागवडीसारखे सोपे उपाय योजले पाहिजेत, अशी भूमिका ते घेत. त्यांचे आयुष्य संघर्षमय होते. संघर्षासाठी आपल्यामागे किती लोक आहेत, याचाही विचार केला नाही. सतत कार्यमग्न राहणे, हा त्यांचा स्थायीभाव होता. स्तृतिग्रंथाच्या माध्यमातून त्यांचा विविधांगी परिचय करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असे डॉ. संदीप नाटेकर म्हणाले.