
‘शिवगर्जना’ महानाट्यास कुडाळात उत्स्फूर्त प्रतिसाद
९०३१४
‘शिवगर्जना’ महानाट्यास
कुडाळात उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ ः माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांच्या माध्यमातून विशाल सेवा फाउंडेशन आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आयोजित ‘शिवगर्जना’ महानाट्याचे कुडाळ येथे मोफत तीन दिवस आयोजन करण्यात आले. तिन्ही दिवस ‘हाउसफुल्ल’ चाललेल्या या महानाट्याच्या अंतिम दिवशी शिवप्रेमी जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विशाल परब यांनी आभार व्यक्त केले. या महानाट्याला सुमारे ८० ते ९० हजार शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शवून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला. यापुढेही लोकांच्या सेवेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध राहणार असून जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेस सहकार्यासाठी तत्पर राहू, असे परब म्हणाले.
--
९०३१३
महेंद्र पटेल यांचा पुरस्काराने गौरव
सावंतवाडी ः येथील श्रीराम वाचन मंदिरचे ग्रंथपाल महेंद्र पटेल यांना जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने आदर्श ग्रंथपाल पुरस्काराने गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या गोवेरी (ता. कुडाळ) येथे आयोजित वार्षिक अधिवेशनात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांच्या हस्ते काल (ता. १९) हा पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आनंद वैद्य, सचिव मंगेश मसके आदी उपस्थित होते.