दुसऱ्या दिवशीही एसटीमध्ये महिलांचा आवाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या दिवशीही एसटीमध्ये महिलांचा आवाज
दुसऱ्या दिवशीही एसटीमध्ये महिलांचा आवाज

दुसऱ्या दिवशीही एसटीमध्ये महिलांचा आवाज

sakal_logo
By

दुसऱ्या दिवशीही एसटीत गर्दी महिलांचीच

चिपळूण आगार ; लांब पल्ल्याच्या गाड्या फुल्ल

चिपळूण, ता. २० ः सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीत आता महिलांचा आवाज आहे. राज्य सरकारने महिलांसाठी ५० टक्के सवलतीच्या प्रवासाची घोषणा केल्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशीही एसटीमध्ये सर्वाधिक महिलांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. शुक्रवारपासून चिपळूण आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या फुल्ल झाल्याचे दिसले. आरक्षणासाठीही रांगा लागल्या होत्या. ही योजना एसटीला ऊर्जितावस्था आणेल. असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत.
आर्थिक अडचणींचा सामना करणारे एसटी महामंडळ आता मालामाल होत असून महिला प्रवाशांच्या तिकिटातून चिपळूण आगाराने दोन दिवसात लाखो रुपयांची कमाई केली आहे. कोरोना महामारीमुळे एसटीची प्रवासी संख्या कमालीची खालावली असल्याने त्यांना आपला आर्थिक गाडा चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कामगारांचे पगार चुकते करण्यासाठी राज्य सरकारकडून कोटयवधी रुपयांचा निधी दिला जातो. दरम्यान, रोडावलेली प्रवाशी संख्या वाढवण्याबरोबरच महिलांना दिलासा देण्यासाठी सरकारने एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीने ''महिला सन्मान योजना'' जाहीर करत शुक्रवारपासून त्याची अमलबजावणी सुरू केली आहे. तेव्हापासून महिला प्रवाशांचा उत्साह वाढला आहे. सवलतीच्या पहिल्या दिवशी ४ हजार ९०० जणींनी अर्ध्या तिकीटात फुल्ल प्रवास केला. यातून चिपळुण आगाराला १ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही एसटीला महिलांचा प्रतिसाद चांगला होता. रविवारी ११ हजार ४५७ महिलांनी एसटीने प्रवास केला. यातून चिपळूण आगाराला २० लाख ३ हजार ७२ रुपयाचे उत्पन्न मिळाले.
-
परीक्षेनंतर एसटीतील गर्दी वाढणार
महिलांना तिकिटात सवलत जाहीर झाल्यापासून गेल्या दोन दिवसांत सर्वच एसटी स्थानकात पुरुष प्रवाशांच्या तुलनेत महिलांची संख्या मोठी दिसत आहे. दरम्यान, सध्या सर्वच शाळांच्या परीक्षा सुरू असून एप्रिलमध्ये शाळांना टप्प्याटप्याने उन्हाळी सुट्टी लागणार आहे. त्यामुळे एसटीच्या गाडया पूर्ण क्षमतेने खचाखच भरून धावतील असा विश्वास एसटीचे आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी व्यक्त केला.