रत्नागिरी-आंतरजिल्हा बदलीत विद्यार्थ्यांच्या हित पाहणार का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-आंतरजिल्हा बदलीत विद्यार्थ्यांच्या हित पाहणार का
रत्नागिरी-आंतरजिल्हा बदलीत विद्यार्थ्यांच्या हित पाहणार का

रत्नागिरी-आंतरजिल्हा बदलीत विद्यार्थ्यांच्या हित पाहणार का

sakal_logo
By

आंतरजिल्हा बदलीत विद्यार्थ्यांचे कधी पाहणार ?
जिल्हा परिषद ; संपामुळे प्रस्ताव शिक्षण विभागाकडेच

रत्नागिरी, ता.२० ः आंतरजिल्हा बदल्या करताना विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन शिक्षकांना कार्यमुक्त करा, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. त्याचा विचार रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये करण्यासाठी शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू आहेत. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कोणता निर्णय घेणार यावर आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्‍या सातशेहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

बारा वर्षात प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जिल्ह्यात सध्या ११०० हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही परिस्थिती असताना आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची त्यामध्ये भर पडत आहे. यंदा ७०६ शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या यादीमध्ये आहेत. शासनाने यापुर्वी दहा टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त असतील तेथे शिक्षकांना सोडू नये, असे आदेश होते; परंतु सरकारने तो नियम शिथिल करुन दोन महिन्यापुर्वी नव्याने शासन निर्णय काढला आहे. त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना १ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत आणि कोणत्याही परिस्थितीत कार्यमुक्त करावे अशा सूचना आंतरजिल्हा बदलीसाठी शासनाने काढले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्‍यांचा संप सुरू झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्‍यांकडे फाईल पाठविण्यात आलेली नव्हती. संप मागे घेतल्यामुळे पुढील दोन दिवसात यावर कार्यवाही होईल. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आंतरजिल्हा बदलीने शिक्षक सोडण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत. या शासन निर्णयामध्ये बदलीसाठी दिलेल्या आदेशात विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन शिक्षकांना कार्यमुक्त करा. असे नमूद केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याची रिक्त पदे आणि शिक्षकांना सोडल्यानंतर होणारी रिक्त पदे यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम याचा विचार अधिकारी करण्याची शक्यता आहे. शासन निर्णयातील तरतुदीमध्ये टप्प्याटप्प्याने सोडा असे नमूद केले असल्याने अधिकार्‍यांकडून त्याचा योग्य अर्थ घेतला तर एकाचवेळी बदल्या होणार नाहीत. प्रशासनही या तरतुदींचा विचार करून सीईओंकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

चौकट
तर तीन शाळांना एक शिक्षक
जिल्हा परिषदेत एकूण पावणेसहा हजार शिक्षक असून सध्या १६ टक्के पदे रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सोडल्यास १८०० शिक्षक रिक्त होतील. त्यामुळे रिक्त पदे ३३ टक्के होतील. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या पाहता दोन शाळांना एक शिक्षक असे चित्र जिल्ह्यात निर्माण होईल.