
माजी पंचायत समिती सदस्य भोगलेंना अटकपूर्व जामीन
माजी पंचायत समिती सदस्य
भोगलेंना अटकपूर्व जामीन
ओरोस, ता. २० ः कुडाळ पंचायत समितीतील बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विनायक चव्हाण यांना कार्यालयात येऊन मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी पंचायत समिती सदस्य आनंद उर्फ आना भोगले (रा. वेताळबांबर्डे) यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने मंजूर केला; मात्र भोगले यांनी ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात राहण्याची मनाई करणारा तसेच ३० एप्रिलनंतर चार्टशिट दाखल होईपर्यंत महिन्याच्या पहिल्या सोमवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली.
याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. यात चव्हाण यांनी, उपअभियंता राजेंद्र कुलांगे व आपण दुपारी कुडाळ येथे आल्यानंतर मी माझ्या कुडाळ येथील घरी जेवणासाठी गेलो असता आनंद भोगले यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले निवजे हरिजनवाडी रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणे या कामाचे वाढीव मूल्यांकन करून दे, असे सांगून शिवीगाळ केली. मी त्यांना कार्यालयात येतो, मग बोलू, असे सांगितले. या दरम्यान भोगले हे कार्यालयात दांडा घेऊन मला शोधत होते. तसेच शिवीगाळ करत होते. त्यानंतर त्यांनी उपअभियंता कुलांगे यांच्या केबिनला कडी घालून त्यांना कोंडून ठेवले. सायंकाळी कार्यालयात गेल्यावर उपअभियंता कुलांगे यांनी आपल्या केबिनमध्ये मला बोलावले असता तेथे उपस्थित असलेले भोगले यांनी शिवीगाळ करून हातातील दांडा माझ्या हातावर मारला. तसेच यावेळी आमदार फंडातील कडावल येथील रस्त्याचे अंदाजपत्र आताच द्या, अन्यथा केबिनच्या बाहेर जाऊ देणार नाही, असे सांगून जातिवाचक शिवीगाळ केली. या तक्रारीवरून कुडाळ पोलिस ठाण्यात भोगले यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा व कर्मचाऱ्याला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.