चिरेखाणीत केला मिरी लागवडीचा प्रयोग

चिरेखाणीत केला मिरी लागवडीचा प्रयोग

90469
90470
आंबडोस ः येथे चिरेखाणीच्या मातीत धोंडी नाईक यांनी काळी मिरीची लागवड केली आहे.


चिरेखाणीत केला मिरी लागवडीचा प्रयोग

आंबडोसमध्ये शेती; दुर्लक्षित बुश मिरीतून घेतले उत्पन्न

प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : शेतकऱ्यांकडून काहीसे दुर्लक्षित झालेल्या बुश मिरीची तालुक्यातील आंबडोस-गावठणवाडी येथील धोंडी अनंत नाईक या शेतकऱ्याने चिरेखाणीत सुमारे एक गुंठा क्षेत्रामध्ये व्यावसायिकदृष्ट्या लागवड केली आहे. उत्पन्नाचा शाश्वत स्रोत म्हणून शेतीची ओळख असली तरी शेतीकडे दुर्लक्ष होत असताना नाईक यांनी व्यावसायिकदृष्ट्या शेतीची कास धरली आहे.
चिरेखाणीत त्यांनी मिरवेलची कौशल्याने लागवड केली. वाढत्या तापमानाचा रोपावर प्रतिकुल परिणाम होऊ नये, म्हणून रोपांना पाणी देण्याची व्यवस्था केली. सद्यस्थितीमध्ये रोपांवर काळी मिरीची चांगलीच फळधारणा झाली आहे. २० ते २५ किलो मिरी त्यांनी विकली आहे. आतापर्यंत स्थानिक बाजारपेठेत ३०० ते ४०० रुपये किलोचा दर नाईक यांना मिळाला आहे. मसाल्याच्या उत्पादनासाठी काळी मिरीला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने चांगला दर नाईक यांना मिळत आहे. भविष्यामध्ये मिरीची पावडर बनवून विक्री करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचबरोबर बुश मिरीची रोपे करून विकण्यासाठीचे नियोजनही असल्याचे नाईक यांनी सांगितले. याशिवाय नारळ, केळी, सुपारी, बांबू, शेवगा यांचीही त्यांनी लागवड केली आहे. मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये पिकविलेल्या भाजीपाल्याची ते परिसरामध्ये विक्री करतात. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. मिरीच्या शेतीसाठी कृषी सहाय्यक धनंजय गावडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, असे नाईक यांनी सांगितले. जास्त उत्पादन करण्यासाठी रासायनिक खतांचा भडिमार करण्याऐवजी नाईक यांनी सेंद्रिय खताला प्राधान्य दिले आहे.
..............
कोट
काळी मिरी वेलाची तीन प्रकारची वाढ दिसून येते. यात झाडावर सरळ वाढणारा वेल, जमिनीवर आडवा वाढणारा वेल, धारणा करणारा खाली लोंबळणारा वेल, लोंगर धरणारा खाली लोंबळणारा वेल आदींचा समावेश होतो. बुश पेपर मिरी शेतामध्ये लावली असल्यास प्रत्येक झुडपापासून प्रतिकिलो २०० ते २५० ग्रॅम वाळलेली मिरी लागवडीच्या तिसऱ्या वर्षापासून मिळते. अशा या बुश पेपर मिरीची लागवड कमी जागेत होत असल्याने आणि वेलीवर भरपूर घड येत असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
- धनंजय गावडे, कृषी सहायक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com