
गोळपमधील नदीवर श्रमदानातून बंधारा
-rat२१p१३.jpg-
९०४८०
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप परिसरामध्ये वनराई बंधारा बांधताना ग्रामस्थ.
-rat२१p१४.jpg-
९०४८१
वनराई बंधारा बांधल्यानंतर झालेला पाणीसाठा.
-
गोळपमधील नदीवर श्रमदानातून बंधारा
जनसेवा सामाजिक मंडळ ; एप्रिल, मे मध्ये ग्रामस्थांना फायदा
पावस, ता. २१ ः अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळातर्फे गोळपमधील मोरवठार वाडीच्या खालच्या बाजूला लोकसहभागातून नदीवर बंधारा बांधण्यात आला. तसेच त्याच नदीवर दुसरीकडे असलेल्या सिमेंट बंधारामधील दरवाजे बंद केले. त्यामुळे तिथेही चांगला पाणीसाठा झाला. यावर्षी जनसेवा मंडळातर्फे नद्यांवर सात बंधारे बांधण्यात आले.
पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून समुद्रात जाते. हे पाणी गावागावातून अडविण्यासाठी मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. गेली तीन वर्षे मंडळातर्फे बंधारे बांधले जात आहेत. त्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थांचे सहकार्य मिळते. नागरिकांमध्ये अजून याबाबत जागृती उत्साह दिसत नाही; मात्र कालांतराने नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढेल आणि अशी लोकोपयोगी कामे लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर होतील, असा विश्वास अविनाश काळे यांनी व्यक्त केला. गोळप मोरवठार येथे मंडळाच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून मोठा बंधारा बांधला. या बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला आहे. या साठलेल्या पाण्याचा उपयोग एप्रिल, मे महिन्यात ग्रामस्थांना होणार असून परिसरातील विहिरींची पाणीपातळीही स्थिर राहण्यास मदत होणार आहे.
प्रत्येक गावात लोकसहभागातून अशाप्रकारे पाणी अडवले गेले पाहिजे. बंधारे हे कोणत्याही शासकीय खात्यावर अवलंबून न राहता लोकसहभागातून बांधले गेले पाहिजेत. त्यामुळे खालच्या भागातील पाणीसाठा वाढतो. पाण्याची पातळी उंचावते. यासाठीच गावोगावी बंधारे चळवळ उभी राहायला हवी, असे काळे यांनी सांगितले.
-