गुढीपाडवा : चैतन्यदायी परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुढीपाडवा : चैतन्यदायी परंपरा
गुढीपाडवा : चैतन्यदायी परंपरा

गुढीपाडवा : चैतन्यदायी परंपरा

sakal_logo
By

गुढीपाडवा : चैतन्यदायी परंपरा

लीड
हवीहवीशी वाटणारी थंडी मावळत आलेली असते आणि धगधगता उन्हाळा होळीचे रंग उधळून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी चक्क निसर्गालाच खुणावत असतो. हिंदू कालगणनेनुसार चैत्र मास आपल्यासोबत नवे वर्ष घेऊन येतो. नवी स्वप्ने, नव्या आशा-आकांक्षा याबरोबरच नवे काहीतरी करण्याचा उत्साह, एखादी मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा हा शुभ दिवस म्हणजेच गुढीपाडवा. अशा या मंगलदिनी आपल्या संकल्पकार्याचा शुभारंभ करायला मिळणे ही प्रत्येकासाठीच आनंदाची आणि समाधानाची बाब असते. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे हे लक्षण आहे. रामाने रावणाचा बिमोड करून अयोध्येत प्रवेश केला, तो दिवस विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीरुपी झेंडा आकाशात दिमाखाने फडकवत प्रत्येक घर साजरा करत असते.
................
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या चौकटीला आंब्याचे तोरण बांधले जाते. हा सण आनंद, मांगल्य यांचे प्रतीक असतो. या दिवशी सर्व कुटुंबीय नवीन कपडे घालून गुढीची पूजा करतात. या दिवशी बऱ्याच ठिकाणी विशेष प्रसाद देतात. यात लिंबाचा मोहोर, चिंच, गूळ, खोबरे, हिंग घालून चटणी बनवली जाते आणि ती घरातील सगळ्यांना वाटली जाते. यातील खासियत म्हणजे, त्यातील प्रत्येक घटक हा आयुर्वेदाच्या गुणांनी बनलेला असतो. जसे की चिंच रक्त शुद्ध करण्यासाठी, कडूनिंब उष्णता कमी करण्यासाठी असतो, खोबरे शरीरातील थंडपणा वाढवते. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या वर्षाची राशी म्हणजेच ज्वारी, गहू घरी आणलेले असते आणि कणग्यात भरले जाते.
या रुपाने घरात लक्ष्मीचे आगमन झालेले असते. या कारणाने शेतकरीही खूश असतो. धार्मिकतेनुसार बोलायचे झाले तर, याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि धर्माचा विजय करून अयोध्येला आले. हा दिवस म्हणजे चैत्र महिन्याच पहिला दिवस होता, म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. याच दिवशी शिव-पार्वतीचा विवाह निश्चित होऊन तृतीयेला झाला. त्याचबरोबर कुंभाराचा मुलगा शालिवाहन यांनी मातीचे सैन्य करून त्यांच्यावर चैतन्याचा मंत्र टाकून जिवंत केले आणि हुमनांसारख्या शत्रूचा पराजय केला. असे अतुलनीय पराक्रम आणि सोहळे याच दिवशी झाले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.
आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा सण म्हणून गुढीपाडवा साजरा होऊ लागला. साडेतीन महुर्तांपैकी गुढीपाडव्याचा हा एक मुहूर्त मानला जातो आणि याच दिवशी आपले भारतीय पंचांग बनविले जाते. त्याची पूजा करूनच त्याच्यातील नक्षत्र आणि ग्रह यांचा अभ्यास केला जातो. या दिवशी नियोजित सर्व कार्य आणि नवे उद्योग,व्यवसाय, सुरू करतात तसेच, वास्तू प्रवेश, व्यवहार, महत्त्वाची खरेदी आणि सोन्याच्या खरेदीसारखे व्यवहार केले जातात.
भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रुढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारीत असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्य प्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो. जय नावाच्या २८ व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या ४७ व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात आणि ४८ व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७ च्या संवत्सरापर्यंत सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकुलता याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात, ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुख-शांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही, ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती; पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे.
---
सणाला अधुनिक रूप
पूर्वी सूर्योदयाला गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने देवांचे पूजन, गोडधोडाचे भोजन असा साधेपणाने कौटुंबिक जिव्हाळ्याने साजरा होणारा हा सण आता कौटुंबिक स्तराबरोबरच सामाजिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची आधुनिक प्रथा सुरू झाली. महाराष्ट्रातील विविध भागांत संस्कृती संवर्धन, समाज परिवर्तन, विविध संस्कार मूल्यांच्या प्रसारासाठी शोभायात्रा काढली जाते. संत विचारांची आठवण, त्यांचे विचार, विविध समाजसुधारक व्यक्तिमत्त्वांची ओळख, त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान, विविध पारंपरिक वेशभूषांचे लख्ख सौंदर्य, पावित्र्य यामधून आजच्या तरुण पिढीमध्ये संस्कार रुजवण्याचा प्रयत्न होतो. अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञाननिष्ठ परंपरांमधून आधुनिक पद्धतीने नवीन विचारमंथनामधून या सणाचे ‘साजरीकरण’ असे नवे रूप प्राप्त झालेय.