
राणेंकडे असेपर्यंतच सतीश सावंतांना किंमत
90512
बंडू हर्णे
राणेंकडे असेपर्यंतच
सतीश सावंतांना किंमत
हर्णे; स्टॉलधारकांचे लवकरच पुनर्वसन
कणकवली, ता. २१ : जोपर्यंत सतीश सावंत राणेंकडे होते, तोपर्यंतच त्यांना किंमत होती. त्यामुळे शिवसेनेत जाऊन शून्य किंमत झालेल्या सावंत यांनी स्टॉलधारकांच्या मुद्यावरून राणेंवर नाहक टीका करू नये. स्टॉल हटाव मोहिमेत बाधित झालेले स्टॉलधारक, विक्रेते यांचे आम्ही लवकरच पूनर्वसन करणार आहोत, अशी ग्वाही उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख सावंत यांनी आज राणेंवर टीका केली. त्याला उपनगराध्यक्ष हर्णे यांनी नगराध्यक्ष दालनातील पत्रकार परिषदेत उत्तर दिले. श्री. हर्णे म्हणाले, "कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमिष दाखवून सावंत यांना विधानसभेचे जिल्हाप्रमुखपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर राणेंवर सतत टीका करण्याचेही कॉन्ट्रॅक्ट त्यांना शिवसेना पक्षाकडून देण्यात आले आहे; पण राणेंवर टीका करण्याआधी सावंत यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. राणेंकडे होते तेव्हाच त्यांना किंमत होती. राणेंची साथ सोडल्यानंतर एकेकाळी राजन तेलींचे पीए असलेल्या विठ्ठल देसाई यांनी सावंत यांना जिल्हा बँक निवडणुकीत पराभूत केले. महामार्ग ठेकेदाराशी राणेंनी मांडवली केल्याचा आरोप सावंत करत आहेत. तसे असते तर शेडेकर प्रकरण घडले नसते. या प्रकरणी आमदार नीतेश राणेंसह भाजपचे कार्यकर्ते जेलमध्ये गेल्यानंतर हीच शिवसेनेची मंडळी भाजप कार्यकर्त्यांना आणखी त्रास देऊन ठेकेदाराची बाजू घेऊन उभी राहिली होती."
श्री. हर्णे पुढे म्हणाले, ‘‘महामार्ग चौपदरीकरण झाले, त्याचवेळी शहरातील शेकडो स्टॉलधारक, विक्रेते विस्थापित झाले. या सर्व स्टॉलधारकांचे पुनर्वसन राणेंच्या माध्यमातून आम्हीच केले. त्यावेळी सतीश सावंत पुढे आले नव्हते. आता महामार्ग विभागाने स्टॉल हटाव मोहीम राबवली. यात स्टॉलधारक, विक्रेते पुन्हा विस्थापित झाले आहेत; मात्र त्यांचे आम्ही नव्या जागेत पुनर्वसन करणार आहोत. आम्ही स्टॉलधारकांना अजिबात वाऱ्यावर सोडलेले नाही. कणकवली शहरात मागील पाच वर्षांत चार नवीन रस्ते तयार झाले. रिंगरोडचे दोन टप्पे मार्गी लागले. स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभे राहिले. कृत्रिम धबधबा निर्माण होत आहे. प्रत्येक प्रभागातील रस्त्यांचे नूतनीकरण झाले. जर कमिशन खाल्ले असते, तर एवढी कामे झाली नसती.’’ विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन तातडीने करा, असे सावंत सांगत आहेत. खरे तर सिंधुदुर्गातील शेकडो ठेवीदारांच्या आयुष्याची पुंजी अडकलेल्या संचयनी संस्थेमध्ये पूर्वी कार्यरत असलेले सावंत गेल्या वीस वर्षांत या ठेवीदारांना एक रुपया देऊ शकलेले नाहीत. ते आता भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन तातडीने करा, असे सांगत आहेत, अशी टीकाही श्री. हर्णे यांनी केली.
..................
चौकट
... तर भाजी विक्रेत्यांचे मार्केटमध्ये पुनर्वसन
भाजी मार्केट उभारणाऱ्या विकासकाने या इमारतीपर्यंत जाण्यासाठी नऊ मीटरचा रस्ता दिलेला नाही. त्यामुळे इमारत हस्तांतरण झालेले नाही. जर विकासकाने भाजी मार्केटपर्यंत जाण्यासाठी नऊ मीटरचा रस्ता तयार केला, तसा प्रस्ताव नगरपंचायतीकडे दिला, तर प्रशासन जरूर त्याला मान्यता देईल. तसे झाले तर शहरातील भाजी विक्रेत्यांचे आम्ही तातडीने भाजी मार्केटमध्ये पुनर्वसन करू, अशी ग्वाही श्री. हर्णे यांनी दिली.