
शशिकांत वारिशे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात
शशिकांत वारिशे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात
रत्नागिरी, ता. २१ : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालविण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.
विधानसभेत या विषयावरील लक्षवेधीला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोणाला पाठिशी घालणार नाही किंवा सोडणार ही नाही असे निक्षून सांगितले. विधानसभेत अतुल भातखळकर, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अन्य सदस्यांनी ही लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी नि:पक्षपणे व्हावी यासाठी डीजींना लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शशिकांत वारिशे हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने केली होती. ती आज मान्य झाल्याने हे परिषदेचे आणखी एक यश मानले जात आहे. या निर्णयाचे स्वागत करताना हा पत्रकारांच्या एकजुटीचा विजय असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले आहे.