चिपळूण-मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची ड्रोनने पाहणी

चिपळूण-मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची ड्रोनने पाहणी

मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची ड्रोनने पाहणी

दर महिन्यातून एकदा उपक्रम; १० ड्रोन ठेकेदारांनाच घ्यायचे आहेत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम किती झाले ते दर महिन्यातून एकदा ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. दर दिवशी किती काम झाले, हे ड्रोनच्या माध्यमातून पाहिले जाणार आहे. १० ड्रोन ठेकेदारांनाच घ्यायचे आहेत. युद्धपातळीवर हे काम केले जाणार आहे. कारण हा रस्ता महत्वाचा आहे. शासनाची भूमिका आहे. मे महिन्याच्या आधी सिंगल लेन पूर्ण होईल. डिसेंबरपर्यंत दोन्ही लेन पूर्ण होतील. पनवेल ते कासू १५१ कोटी आणि कासू ते इंदापूरपर्यंतच्या कामाला ३३२ कोटी रुपये लागणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली.
मुंबई ते गोवा हा महामार्ग गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. त्यासाठी विविध अडचणी आजपर्यंत सांगितल्या गेल्या. हा मुद्दा विधानपरिषदेत गाजला. प्रवीण दरेकर, जयंत पाटील, अनिकेत तटकरे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, या विभागाचे मंत्री सिंधुदुर्गचे रवींद्र चव्हाण असतानासुद्धा या रस्त्याचे काम होत नाही. त्यामुळे कोकणातील लोकांची मोठी गैरसोय होत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
अलिबागकडे वळणारा रस्ता तयार आहे. फक्त १० ट्रक माती टाकून उर्वरित काम पूर्ण करायचे आहेत. रामवाडीजवळ गणपतीमध्ये पेणला वाहतूक खोळंबते. रस्त्याचे काम पूर्ण झाले. पण एक इमारत रस्त्यामध्ये आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. भूसंपादनात कुणाला किती पैसे द्यायचे, यासाठी अधिकाऱ्यांमध्ये वाद आहे. रोहित कॉम्प्लेक्स गृहनिर्माण संस्था ही बिल्डिंग कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे.
याबाबतीत निर्णय घ्यावा असे सांगत इंदापूरपर्यंत इस्टिमेट किती होते, पैसे किती दिले आणि आणखी किती द्यावे लागणार आहेत, असा प्रश्‍न जयंत पाटील यांनी केला. तर खेड ते लोटे घाट हा रस्ता अपघातप्रवण आहे. त्यासाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे. सरकार यासाठी काय करणार आहे, असा प्रश्‍न अनिकेत तटकरे यांनी केला.
मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, या रस्त्याचे काम बीओटीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० पॅकेजमध्ये हा रस्ता केला जाणार आहे. भूसंपादनात अडचणी आल्या होत्या. वनखात्याच्याही काही अडचणी होत्या. परवानग्या मिळत नव्हत्या. पण आता सकारात्मक काम सुरू झाले. बांद्र्यापासून राजापूर ते शिर्डीपर्यतचा रस्ता जिल्हा परिषदेकडे होता. त्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.

१०० टक्के भूसंपादन
मंत्री चव्हाण म्हणाले, ‘परशुराम घाटातील रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पावसाळ्यातली अडचण दूर होणार आहे. पनवेल - कासू ते इंदापूरपर्यंत ८४ किलोमीटरचा रस्ता आहे. १५५६ जमिनीची प्रकरणे प्रलंबित होती. आता १०० टक्के भूसंपादन झाले. सुरक्षा घेऊन हे काम पूर्ण ताकदीने सुरू आहेत. पूर्वीच्या ठेकेदाराचा लवाद न्यायालयात सुरू आहे. नव्याने दोन ठेकेदारांना काम दिले आहे. गुढीपाडव्याला कामांना सुरुवात होईल.चौपदरीकरणाचा रस्ता आहे. मे महिन्यापर्यंत सिंगल लेन पूर्ण झाली पाहिजे, असा प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com