सिंधुदुर्गात शासकीय कामकाज पूर्ववत

सिंधुदुर्गात शासकीय कामकाज पूर्ववत

सिंधुदुर्गात शासकीय कामकाज पूर्ववत
आर्थिक वर्षाखेरीमुळे प्रशासकीय कामांना वेग
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी बेमुदत संपावर गेलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचारी संघटनेने सात दिवसांनंतर आंदोलन मागे घेतले. यामुळे जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांतील कामकाज आजपासून पूर्वपदावर आले. आर्थिक वर्षाखेर अवघ्या दहा दिवसांवर आल्याने प्रशासकीय कारभाराने पुन्हा वेग घेतला.
पोलिस विभागाव्यतिरिक्त विविध कर्मचाऱ्यांच्या संघटना ‘आर या पार’ असा इशारा देत मैदानात उतरल्याने संप चिघळणार, असे चित्र होते. राज्याने मेस्मा लावण्याचा इशारा देत कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्याच्या हालचालीही सुरू केल्या, तरीही कर्मचारी माघार नाही, यावर ठाम होते.
कर्मचारी संपावर गेल्याने कोणीही नागरिक कामासाठी कोणत्याही कार्यालयाकडे फिरकताना दिसला नाही. अधिकारी दालनात हजर होते; परंतु त्यांना काही कामच नव्हते. केवळ तातडीचे काय असेल तर ते काम केले जात होते; अन्यथा कोणत्याही फाईल या टेबलवरून त्या टेबलवर किंवा या संगणकातून दुसऱ्या संगणकात पुढे सरकताना दिसत नव्हत्या. काही विभागांत कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अधिकारी आपला दिवस भरत होते; मात्र आजपासून कामकाज पूर्ववत झाले.
अजूनही संभ्रमच
कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या संपाला यश आल्याचे कर्मचारी वर्गातून सांगितले जात आहे; परंतु अजून काही कर्मचाऱ्यांना भीती वाटत आहे. कारण यापूर्वी जुन्या पेन्शनसाठी संप करण्यात आला होता, त्यावेळी समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीने काय केले, हे अद्याप बाहेर आलेले नाही. आता मिळालेल्या आश्वासनानुसार नियुक्त समितीने कारभार केल्यास काय, असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com