जयगड पंचक्रोशीला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयगड पंचक्रोशीला पावसाने झोडपले
जयगड पंचक्रोशीला पावसाने झोडपले

जयगड पंचक्रोशीला पावसाने झोडपले

sakal_logo
By

९०५७८
पान १ )

जयगड पंचक्रोशीला पावसाने झोडपले
बागायतदारांची तारांबळ; आंब्यावर करप्याची शक्यता
रत्नागिरी, ता. २१ ः हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जयगड पंचक्रोशीसह आजूबाजूच्या परिसरात वीस मिनिटे मुसळधार पावसाने झोडपले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे बागायतदारांची त्रेधातिरपीट उडाली. याचा परिणाम आंब्यावर होणार असून करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यापासून हापूस वाचवण्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे.
रत्नागिरी व रायगडसह राज्यातील अन्य जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर चार तासांत विजांच्या कडकडांटसह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज मुंबई येथील वेधशाळेने व्यक्त केला होता. त्यानुसार सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास समुद्रकिनारी परिसरात जयगड, खंडाळा, पन्हळी, वाटद, सैतवडे, जांभारी, कासारी, कचरे, वरवडेसह खाडी पट्ट्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वेगवान वाऱ्‍यासह सुरू झालेल्या पावसाने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. खंडाळा बाजारपेठेत रस्त्यावरील फेरीवाल्यांनी सुरक्षित ठिकाणी साहित्य हलवले. त्यात अनेकांचे साहित्य भिजले. आंबा हंगाम सुरू असल्यामुळे अनेक बागायतदारांनी लाकडी पेटीचे साहित्य, गवत मोकळ्या जागेत ठेवले होते. ते पावसात भिजू नये यासाठी प्लास्टिकच्या कागदांनी झाकून ठेवण्यासाठी धावपळ उडाली. या पावसामुळे आंबा, सुपारीसह काजूचे नुकसान होणार आहे. पावसाचा जोर वीस मिनिटे होता.
जयगड पंचक्रोशीतील बागायतदार आशिष भालेराव म्हणाले, ‘या पावसामुळे जयगड पंचक्रोशीतील आंबा बागायतदार अडचणीत येणार आहेत. यंदा आंबा उशिराने आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काही बागायतदारांनी आंबा काढून सायंकाळी मुंबईत बाजारात पाठविण्याची तयारी केली होती. पावसामुळे त्यात खंड पडला आहे. आंबा कमी आणि कामगार खर्च, कराराच्या बागांसाठीची गुंतवणूक, औषध फवारणी, वाहतूक यासाठी बँकांचे कर्ज घेतले आहे. असाच अवकाळी पाऊस पडत राहिला तर परिस्थिती बिकट होईल.’

कोट
सायंकाळी पाऊस पडल्यामुळे पाणी फळाच्या देठावर जमून तसेच राहील. सकाळी पडला असता तर दिवसा उन्हामध्ये ते पाणी सुखले असते; परंतु आता रात्रभर पाणी तसेच राहील. परिणामी, करपा रोगाचा आणि अन्य कीटकांचा प्रादुर्भाव या परिसरातील आंब्यावर होईल. त्यासाठी औषध फवारणीचा खर्च बागायतदारांना सहन करावा लागेल.
- उमेश रहाटे, बागायतदार, जयगड