
वालोपेतील युवकाचा पुण्यात खून
पान 1 साठी)
90570
वालोपेतील युवकाचा पुण्यात खून
चिपळूण हादरले; किरकोळ भांडणाचा तिघांनी घेतला बदला
चिपळूण, ता. २१ ः शहरालगतच्या वालोपे मयेकरवाडी येथील युवकाचा पुणे येथे किरकोळ भांडणातून दगडाने ठेचून खून करण्यात आला. या तिघांनी युवकाचे अपहरण करून खून केला. वालोपे मयेकर वाडी येथील सौरभ शैलेंद्र मयेकर (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता. 20) रात्री या युवकाचा पुण्यात खून झाला आहे. मंगळवारी सकाळी सौरभचा मृतदेह वालोपे येथे आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यातील वालोपे येथील तरुणाचा पुण्यात खून झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी पुण्यात धाव घेतली. सौरभ तळेगाव दाभाडे येथे नोकरीनिमित्त वास्तव्याला होता. सोमवारी रात्री किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी तिघांनी सौरभ याचे अपहरण केले. तसेच त्याला साते गावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सक्षम शंकर आनंदे (वय १८, रा. व्हिजन सिटी, जांभूळ) व दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन आरोपी जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे. सौरभचे माध्यमिक शिक्षण पेढे येथे झाले होते. पुढे त्याने आयटीआयचेही शिक्षण घेतले. ८ महिन्यांपूर्वी तो पुणे येथे एका कंपनीत इलेक्ट्रीशन म्हणून काम करीत होता. काही दिवसांपूर्वी तो शिमगोत्सवासाठी गावी आला होता. मात्र मागिल आठवड्यात पुन्हा तो पुण्यात निघून गेला. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे.
शेतीच्या कामात सौरभचा हातखंडा
सौरभला शेतीची चांगली आवड होती. शेतात पावरटिलर चालवण्यात त्याचा हातखंडा होता. शिक्षण सुरू असताना तो नांगरणीची कामे करीत असे. या कामासाठी तो वालोपे पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. मात्र नोकरी निमीत्ताने त्याला अचनाक पुण्यात जावे लागले. इलेक्ट्रीशनच्या कामात तो रमला होता. अशातच त्याच्या खूनाची बातमी आल्याने वालोपेतील ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला आहे.