
वृक्ष संवर्धनासाठी ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल
वृक्ष संवर्धनासाठी ‘वृक्षरक्षक’ बनावे
धीरज वाटेकर ः उक्ताड शाळेत वनफेरी
चिपळूण, ता. २२ : वृक्षतोड करू नये आणि वृक्ष संवर्धन करावे यासाठी सर्वांना भविष्यात ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल, असे पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उक्ताडच्या विद्यार्थ्यांची वनफेरी काढण्यात आली. जुवाड बेटावर झालेल्या या कार्यक्रमात वाटेकर बोलत होते. ते म्हणाले, ‘सध्याचे दिवस चैत्र पालवीचे दिवस आहे. वनराई आपल्या कोवळ्या पानांसह नवे रूप धारण करून आपल्यासमोर आलेली आहे. जमिनीतील पाणी पातळी पूर्वीपेक्षा कमी झालेली आहे. भविष्यात पाण्याचे संकट गंभीर होणार आहे. पावसासाठी आणि भूगर्भातील पाणी वृक्षांसीठी महत्त्वाचे आहेत. भविष्यात पिण्यासाठी पाणी हवे असेल तर घराशेजारी वृक्ष लावावे आणि त्याचे संर्वधन करावे लागेल. स्वतःहून एखाद्या कुंडीत किंवा जमिनीत बियाणे घालून झाड लावून ते जगविण्याचा प्रयत्न केल्यास ते आपल्याशी हितगुज करीत असल्याचे जाणवेल. यामधून आपण निसर्गाशी एकरूप होऊ, असे वाटेकर यांनी सांगितले.
वनफेरीपूर्वी शाळेत ग्रामस्थ विनोद चिपळूणकर आणि राजेंद्र शिगवण यांच्या उपस्थितीत तीन वर्षे वयाच्या जांभूळ वृक्षाचे रोपण करण्यात आले. शाळा व विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली. अॅक्टिव्ह ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैसर देसाई उपस्थित होते. श्री. देसाई यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. शाळेचे मुख्याध्यापक आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सखाराम जावीर, शिक्षिका सीमा कदम, स्नेहा नेटके यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.