अमली पदार्थ उत्पादनाचा डाव उधळला

अमली पदार्थ उत्पादनाचा डाव उधळला

पान १

अमली पदार्थ उत्पादनाचा डाव उधळला
ठाणे पोलिसांची लोटेत कारवाई; सात जणांना अटक; काही कारखाने रडारवर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ : अमली पदार्थ तयार करण्याचे कारखाने उघडणारे आंतरराज्य रॅकेट ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त केले. या टोळीने लोटे एमआयडीसी परिसरात कारखाना उघडण्याची तयारी सुरू केली होती तत्पूर्वी त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. मात्र लोटे एमआयडीसीतील काही कारखानदार आता गुन्हे शाखेतील पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग असलेल्या मुख्य आरोपीसह एकूण सात जणांना अटक केली आहे. गेल्या वर्षी यातील एका आरोपीने इंजिनियरशी संगनमत करत लोटे एमआयडीसीमध्ये एमडी ड्रग तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचे नियोजन केले होते.
ठाणे येथील गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त अशोक मोराळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत पोलिसांनी प्रथम रायगड जिल्ह्यातील सचिन चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण या दोन भावांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ५२ हजार रुपयांचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले. त्यांच्याकडून पोलिसांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात, हैदराबाद, हरियाणा, उत्तर प्रदेश, ठाणे, लखनऊ, मुंबई, रायगडसह अन्य काही भागातील कनेक्शन उघड झाले. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी संतोष सिंग आणि अभिषेक कुंतल यांनी एमडी हे अमली पदार्थ तयार करण्यासाठी लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाना सुरू करण्याची तयारी केली होती. कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे रिऍक्टर्ससह अन्य साहित्यांची त्यांनी जमवाजमव केली होती. मात्र ब्रोमिन हे केमिकल त्यांना सहज उपलब्ध झाले नाही त्यामुळे लोटे एमआयडीसीमध्ये त्यांचा कारखाना सुरू होऊ शकला नाही, अशी माहिती तपासात उघड झाली.
केमिकल झोन अशी ओळख असलेल्या लोटे एमआयडीसीमध्ये अमली पदार्थ बनवण्याचे प्रकार सुरू आहेत का, येथील केमिकल कंपन्यांमध्ये तयार होणारा माल नक्की कुठे आणि कशासाठी पाठवला जातो याचीही चौकशी होणे आता गरजेचे झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात अमली पदार्थ उपलब्ध होऊ लागले आहेत. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातून एमडी हे अमली पदार्थ विक्रीसाठी आणले जाते. काही वेळा केमिकल कारखान्यात अमली पदार्थ बनवले जात असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. औषधे बनवण्यासाठी वापरण्यात येणारी काही द्रव्य आणि पावडर नशेसाठी वापरली जातात. कारखान्यातून त्याची तस्करी होते हेही यापूर्वी अनेक वेळा उघड झाले आहे. मात्र ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमली पदार्थ विक्रीचे जाळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरले असल्याचे स्पष्ट झाले.

कोट
आम्ही पकडलेल्या संशयितांपैकी दोघांनी लोटे एमआयडीसी येथे एमडी हे अमली पदार्थ बनवण्यासाठी कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना एमआयडीसीमध्ये जागा कशी मिळाली तसेच येथील केमिकल कंपन्या कोणते पदार्थ बनवतात आणि त्याची विक्री कुठे होते, कच्चा माल किती आणला जातो, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
- अशोक मोराळे, अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com