‘महामार्ग’च्या अधिकाऱ्यांवर बांद्यात रोष

‘महामार्ग’च्या अधिकाऱ्यांवर बांद्यात रोष

90741
बांदा ः येथे महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता कांबळे यांना घेराओ घालून जाब विचारताना ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, हुसेन मकानदार, रियाज खान व गाळेधारक. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

‘महामार्ग’च्या अधिकाऱ्यांवर बांद्यात रोष

अतिक्रमणावरील कारवाईवेळी प्रकार; समान जमीन मुद्यावरून विचारला जाब

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः येथील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक गाळेधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आमचा उड्डाणपुलाला विरोध नसून महामार्गाच्या दोन्ही बाजूकडे समान जमीन संपादित करावी. असे झाल्यास स्वतःहून अतिक्रमण काढू, अशी त्यांनी भूमिका घेतली. यावेळी आठ दिवसांत भूमिअभिलेख, राष्ट्रीय महामार्गचे वरिष्ठ अधिकारी व गाळेधारकांची संयुक्त बैठक ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. कांबळे यांनी यावेळी देत अतिक्रमणाची कारवाई तात्पुरती स्थगित केली.
बांदा येथे उड्डाणपुलासाठी सुरुवातीला ठेकेदाराने महामार्गाच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला समान मोजणी करत सीमांकन केले होते; मात्र याला स्थानिकांतून विरोध करण्यात आला. त्यानंतर भूमिअभिलेखच्या १९९१ च्या नकाशानुसार मोजणी करत सीमा निश्चित करण्यात आली. यानुसार बस्थानकाच्या बाजूकडील हद्द ही ३ ते ४ फूट आत आल्याने गाळेधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सीमांकनानुसार हद्द निश्चित करून राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन दिवस अतिक्रमण काढण्याची मोहीम आखली होती.
त्यानुसार आज सकाळीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश खटी हे सुटीवर असल्याने कनिष्ठ अभियंता कांबळे आपल्या सहकाऱ्यांसोबत कारवाई करण्यासाठी दाखल झाले. अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबी देखील मागविले होते. स्थानिक गाळेधारकांनी या ठिकाणी गर्दी केली. ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार, शिवसेनेचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान, गाळेधारक हेमंत दाभोलकर यांच्यासह स्थानिकांनी अभियंता कांबळे यांना घेराओ घालत नियमानुसार सीमांकन करण्याची मागणी केली. यावेळी स्थानिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सीमा निश्चित केली असता भूमिअभिलेखचे अधिकारी का उपस्थित नाहीत, असा प्रश्न केला. संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही ते न पाळता थेट कारवाईसाठी पथक आल्याने नाराजी व्यक्त केली.
---
समस्या सोडविण्याची ग्वाही
येत्या आठ दिवसांत संयुक्त बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्यांचे निराकरण करून तोडगा काढण्याचे आश्वासन अभियंता कांबळे यांनी दिले. त्यानंतर आजची कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली. बैठकीची तारीख लवकरच स्थानिक गाळेधारक, ग्रामपंचायत प्रशासन यांना कळविण्यात येईल, असेही कांबळे यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com