
वीज चोरी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
वीज चोरी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी ः पोलवरुन आलेल्या विद्युत जोडणीमध्ये फेरफार करुन ६.७२० युनिट अशी एकूण १ लाख ४१ हजार ८६ रकमेची विज चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शांताराम भगवान इंदुलकर (रा. झापडे, ता. लांजा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झापडे (ता. लांजा) येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने पोलवरुन आलेल्या विद्युत जोडणीमध्ये फेरफार करुन ६.७२० युनिट अशी एकूण १ लाख ४१ हजार ८६ रुपये रक्कमेची चोरी केली. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता मनाली राजू माळी (वय २८, आयरेचाळ, माऊलीनगर, ता. लांजा) यांनी कायदेशीर तक्रार शहर पोलिसात दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
.........
विदर्भ कोकण बॅंक फोडण्याचा प्रयत्न
रत्नागिरीः करबुडे येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या कॅश केबिनच्या खिडकीच्या काचा फोडून, अज्ञात चोरट्याने आत शिरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) सकाळी नऊच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्याने विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या कॅश केबिनच्या पुढ्यातील खिडकीच्या काचा फोडून, ग्रील पट्टी कापून व वाकवून बॅंकेत शिरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विदर्भ कोकण बॅंकेचे शाखाधिकारी मनिषा नारायण रेगे यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.
--------
प्रवासी महिलेचे दागिने चोरीस
दाभोळ : दापोली बसस्थानकात बसमध्ये शिरत असताना चोरट्याने एका महिला प्रवाशाच्या बॅगेतील १ लाख ९९ हजार ५०० रूपयांचे दागिने पळविले. दापोली पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकिता भागवत या १५ मार्चला बोरीवलीला जाण्यासाठी दापोली बसस्थानकात आल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास दापोली ते बोरीवली शिवशाही एस. टी. बस स्थानकाच्या फलाटला लागल्यावर सौ. भागवत यांनी त्यांची पर्स उजव्या खांद्याला अडकवून त्या बस मध्ये चढत होत्या. गाडीला गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेवून चोरटाने पर्सची चैन उघडून प्लास्टीक पेटीत ठेवलेले १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे चार पदरी मंगळसूत्र, २४ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची कर्णफूले असा एकूण १ लाख ९९ हजार ५०० रूपयांचा ऐवज पळविला. या प्रकरणी सौ. भागवत यांनी दापोली पोलिसात तक्रार दिली.