
संजय कदम यांना पुरस्कार
९०६६७
विरार : येथील कार्यक्रमात संजय कदम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संजय कदम यांना पुरस्कार
कणकवली : शहरातील संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांना भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान पालघरचा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थाध्यक्ष दिनेश भोईर यांच्या हस्ते कदम यांना सन २०२३ सालचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार विरार येथील भाऊसाहेब वर्तक हॉल मध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी संस्था सचिव अंकुश भोईर उपस्थित होते. संजय कदम यांनी संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची याआधीही विविध संस्थांनी दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते कदम यांना गतवर्षी संत रोहिदास संघटना पुणे यांचा राज्यस्तरीय रोहिदास रत्न पुरस्कार मिळाला होता.
--
९०६५३
दर्शन सामंत, चिन्मय चव्हाण
परुळे विद्यामंदिरचे गणित परीक्षेत यश
कुडाळ : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्रावीण्य परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे या प्रशालेतील आठवीतील विद्यार्थी दर्शन सामंत याने वेंगुर्ले तालुक्यात द्वितीय, तर पाचवीतील विद्यार्थी चिन्मय चव्हाण याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. दोघेही राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले. दरवर्षी गणित अध्यापक मंडळाच्यावतीने गणित संबोध, प्रावीण्य व प्रज्ञा परीक्षा घेण्यात येतात. गणित प्रावीण्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेला बसण्याची संधी मिळते. मुख्याध्यापक श्री. माने आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना सौ. सावंत आणि श्री. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
--
इन्सुलीत आरोग्य शिबिरांचे आयोजन
बांदा ः अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, रोटरी क्लब ऑफ बांद्रा आणि उत्कर्ष युवक कला, क्रीडा मंडळ इन्सुली डोबाशेळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी २४ मार्चला महालॅबमार्फत मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच २६ ला इन्सुली गावातील सर्व नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक औषध पुरवठा करण्यात येणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. सांस्कृतिक सभागृह इन्सुली-कोनवाडा येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान शिबिर होणार आहे.
----
साप्ताहिक एक्स्प्रेसला जादा स्लीपर बोगी
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या व सिंधुदुर्गातील कुडाळ स्थानकावर थांबा असणाऱ्या हापा-मडगाव-हापा साप्ताहिक एक्स्प्रेसला दिवसासाठी एक जादा स्लीपर बोगी जोडण्यात येणार आहे. त्यानुसार २४ मार्चची मडगाव-हापा (२२९०७) एका जादा बोगीनिशी धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.