गतवर्षीपेक्षा वाशीत आंब्याचे दर दोन हजारांनी कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hapus Mango
रत्नागिरी ः गतवर्षीपेक्षा वाशीत आंब्याचे दर दोन हजारांनी कमी

Mango Rate : गतवर्षीपेक्षा वाशीत आंब्याचे दर दोन हजारांनी कमी

रत्नागिरी - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी येथील बाजार समितीमध्ये विविध प्रकारच्या आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, यंदा दर २ हजार रुपयांनी कमी राहिले आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा गुडीपाढव्याला अधिक पेट्या दाखल झाल्या आहेत. बुधवारी (ता. २२) सुमारे ६० हजार आंब्याच्या पेट्या मार्केटमध्ये आल्या. यामध्ये कोकणातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गतील ४८ हजार पेट्यांचा समावेश आहे. त्यात देवगडमधील सर्वाधिक ६० टक्के, रत्नागिरीतील २० टक्के आणि रायगड, वेंगुर्ला व बाणकोटमधून उर्वरित २० टक्के आंबा जातो. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधून वाशीत सुमारे १२ हजार पेट्या आल्या आहेत.

साडेतीन मुहुर्तापैकी एक म्हणून गुढीपाडवा सण ओळखला जातो. गेल्या काही वर्षात कोकणातील बागायतदार व्यावसायिक दृष्टिकोन पाहून आंबा लवकरात लवकर बाजारात आणण्याचे नियोजन करतो. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्यात बर्‍यापैकी पेट्या कोकणातून जातात. यंदा वातावरणातील बदलांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना पहिल्या टप्प्यातील उत्पादन अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले.

मार्चच्या पहिल्या आठवड्यांत राजापूरसह रत्नागिरी तालुक्यातील काही भागातून आंबा वाशीकडे पाठवण्यास सुरवात झाली. परंतु, सिंधुदुर्गमधून चांगल्या प्रमाणात आंबा बाजारात गेल्याचे वाशीतील व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये वाशीमध्ये ४० ते ६० हजारच्या दरम्यान आंबा पेटीची आवक होत आहे. गुढीपाडव्याला मोठी वाढ झाली असून, दरही दीड ते ४ हजार रुपये पाच डझनच्या पेटीवर आकारला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंबा अधिक असला तरीही दर २ हजार रुपयांनी कमी आहेत.

एप्रिलमधील आवक घटणार

गेले तीन ते चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. कोकणातील काही भागातही हलका पाऊस झाला. त्याचा मोठा परिणाम आंब्यावर झाला नसला तरीही काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यातील पिकाला धक्का बसला आहे. विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील पावस, जयगड परिसरातील बागायतदारांकडून अवकाळीचा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. मार्च महिन्यात आवक बर्‍यापैकी असली तरी एप्रिल महिन्यात आवक कमी राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

यंदा गुढीपाडवा १५ दिवस अलिकडे आला असला तरीही वाशी बाजारातील आवक वाढलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे दर दोन हजार रुपयांनी कमी आहेत. ग्राहकांकडून प्रतिसादही चांगला मिळतोय. रमजान सुरू होत असल्याने आखाती देशामधून मागणी वाढली असून निर्यातही सुरू झालेली आहे.

- संजय पानसरे, वाशी बाजार समिती