
रत्नागिरी ः जिल्हा पोलिसदलाची सोशल इनिंग
जिल्हा पोलिसदलाची ‘सोशल इनिंग’
व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम ; आता पोलिसांचा स्वतंत्र यू-ट्यूब चॅनल
रत्नागिरी, ता. २३ ः समाजातील बदल आत्मसात करत आता जिल्हा पोलिसदलाने सोशल इनिंगवर भर दिला आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे हे एकमेव माध्यम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बारीकसारीक हालचालींची माहिती, नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी संदेश देणे किंवा गुन्हेगारीला रोखण्यासाठी या सोशल मीडियाचा चांगला फायदा होत आहे. म्हणून जिल्हा पोलिस दलाने आता स्वतंत्र यू ट्युब चॅनल सुरू केले आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते या चॅनलचे उद्धाटन पाडव्याला करण्यात आले. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील उपस्थित होते. जिल्हा पोलिसदलाने देखील आधुनिकतेची कास धरत समाजातील बदलाबरोबर चालून गुन्हेगारीला लगाम घालण्याच्यादृष्टीने चांगले प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी देखील पोलिसदलाने जनजागृतीसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम या समाजमाध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचवले आहे. पोलिसदलाने हाती घेतलेल्या कोणत्याही उपक्रमाबाबत तत्काळ फेसबूक पेजवर त्याची माहिती आणि फोटो अपलोड केले जातात. त्याला लाईक मोठ्या प्रमाणात असतात. या सोशल मीडियाचा जनजागृतीसाठी चांगला उपयोग होत असल्याचे दलाच्या लक्षात आले.
या सर्व माध्यमांबरोबर यु ट्यूबदेखील जनजागृतीपर उपक्रमांचा तसेच सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश, माहिती पोहोचवण्याचे प्रभावी आहे. म्हणून रत्नागिरी पोलिसदलातर्फे स्वतंत्र यु ट्यूब चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच सायबर क्राइम, रस्ते अपघात सुरक्षा, महिला सुरक्षा व ड्रिंक अँड ड्राइव टाळणे या जनजागृतीपर चार चित्रफितींचे लोकार्पण झाले. या चित्रफितीही या वेळी दाखवण्यात आल्या. दलाच्या या नव्या यु ट्युब चॅनलवर कोणताही संदेश किंवा महत्वाची घडामोड जलदगतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहचणार आहे.
--------------
कोट
रत्नागिरी पोलिस या स्वतंत्र यु ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी व उपक्रम पाहण्यासाठी https://www.youtube.com/ @RatnagiriPolice या लिकंवर क्लीक करा. रत्नागिरी पोलिसदलाचे जनजागृतीपर उपक्रम तसेच सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश व माहिती पोहोचावी यासाठी यु ट्यूब हे समाजमाध्यम प्रभावी ठरेल, या उद्देशाने दलाच्या हे स्वतंत्र चॅनल सुरू केले आहे.
- धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक