
संगमेश्वर तालुक्याने पटकावली सहा सुवर्णासह 18 पदके
पान २ साठी)
संगमेश्वर तालुक्यास सहा सुवर्णासह १८ पदके
राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धा ; देवरुखात खेळाडूंचा गौरव
साडवली, ता. २३ ः तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने ३२ वी राज्यस्तरीय अजिंक्यपद क्युरोगी स्पर्धा व आठवी राज्यस्तरीय पुमसे स्पर्धा डेरवण येथे झाली.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. संगमेश्वर तालुका तायक्वांदो अॅकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लब, निवे तायक्वांदो क्लब, पी. एस. बने तायक्वांदो क्लबच्या एकूण ७ खेळाडूंनी जिल्हासंघाचे नेतृत्व केले. यामध्ये फाईट या प्रकारामध्ये सानवी रसाळ हिने ३८ ते ४१ गटात रौप्य पदक प्राप्त केले व स्वराली शिंदे हिने २१ ते २४ गटामध्ये कास्यपदक प्राप्त केले. या दोघींनी अतिशय उत्कृष्ट फाईटचे प्रदर्शन करून जिल्ह्याला पदक प्राप्त करून दिले. पुमसे या प्रकारामध्ये साहिल जागुष्टे २ सुवर्ण,१ रौप्य, २ कास्य, अधिराज कदम १ सुवर्ण, १ कास्य, आयुष वाजे १ सुवर्ण, १ कास्य, दुर्वा जाधव १ सुवर्ण, १ रौप्य, २ कास्य, श्रावणी इप्ते १ सुवर्ण, १ कास्य, सान्वी रसाळ १ कास्यपदक पटकावले.
या यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा देण्याचा छोटेखानी कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह देवरूख या ठिकाणी देवरूख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, क्लबच्या अध्यक्षा स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, टेक्निकल प्रमुख चिन्मय साने, क्लबच्या उपाध्यक्षा ॲड. पुनम चव्हाण, उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, रूपाली कदम, प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हासंघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झालेले दांडेकर यांनासुद्धा देवरूख शहराच्या नगराध्यक्षा शेट्ये यांच्या हस्ते गौरवण्यात आले.