कुडाळात ''बांधकाम''चे प्रश्न सुटणार कसे?

कुडाळात ''बांधकाम''चे प्रश्न सुटणार कसे?

''बांधकाम''चे प्रश्न सुटणार कसे?
कुडाळ नगरपंचायत सभेत सवालः अभियंता वारंवार गैरहजर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ः नगरपंचायतीच्या सभांना अभियंता वारंवार गैरहजर असतात, मग बांधकाम विभागाशी संबंधित प्रश्न असल्यास ते सुटणार कसे, असा सवाल भाजपच्या नगरसेविका संध्या तेरसे व गटनेते विलास कुडाळकर यांनी उपस्थित केला.
येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्यासह नगरसेवक व खातेप्रमुख उपस्थित होते. नगरपंचायतीचे अभियंता सभांना उपस्थित नसतात, याबाबत नगरसेविका सौ. तेरसे व गटनेते कुडाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवक नीलेश परब यांनी संबंधित अभियंत्यांनी यापुढे सभेला ऑनलाईन सभेला उपस्थित राहावे, असा टोला लगावला. नगरपंचायतीच्या बांधकाम विभागात अभियंता वगळता अन्य कोण व्यक्ती असतात, ते कशासाठी तेथे बसलेले असतात, ते शासनाचे कर्मचारी आहेत का, त्यांना नगरपंचायत फाईल्स हाताळण्याचे अधिकार आहेत का, याचे उत्तर प्रशासनाकडून मिळावे, अशी भूमिका सौ. तेरसे यांनी घेतली. नगरसेवक किरण शिंदे यांनीही तेरसे यांचे समर्थन केले.
अग्निशमन यंत्रणेच्या जागेसंदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. अजूनही या जागेसंदर्भात तोडगा काढण्यात आलेला नाही. याविषयी नगरपंचायत प्रशासन नेमके करतेय काय, ठराव घेऊन पुढे कार्यवाही का होत नाही, असा सवाल तेरसे यांनी केला. किरण शिंदे यांनी जागेची पाहणी झाली आहे; पण अधिकारीच पुढे पाठपुरावा करीत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
येथील भंगसाळ नदी किनारीच्या जागेत तीन कोटी रुपयांतून उद्यान उभारण्यावरून सत्ताधारी व विरोधी गटाचे नगरसेवक या सभेत आमने-सामने आले. दोन कोटी मंजूर आहेत, आणखी एक कोटी मिळणार आहेत, अशा या तीन कोटी रुपयांतून पुराच्या पाण्याच्या जागेत उद्यान उभारण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न तेरसेंनी केली. पावसाळ्यात या जागेत पुराचे पाणी येते, मग एवढा मोठा निधी खर्चून तो पाण्यात वाया घालवायचा आहे का? त्यापेक्षा शहरातील अत्यावश्यक कामांसाठी हा निधी खर्च करावा, अशी मागणी त्यांनी केली. या उद्यानासाठी ४८ हजार रुपये खर्च करून प्रशासनाने जमिनीची मोजणी केली. मग ही जमीन दाखवा, असे आव्हान परब यांनी दिले. उपनगराध्यक्ष शिरसाट यांनी नदी किनारी संरक्षक भिंत उभारून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले, तरीही विरोधी नगरसेवकांनी या जागेत उद्यान होण्यास हरकत घेतली. तसेच पुराच्या पाण्याची जागा वगळून उर्वरित जागेत उद्यान व्हावे, असे सुचित केले.
किरण शिंदे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाने नोटिसा बजावल्या, मात्र पुढे कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित करून कारवाईची मागणी केली. वेंगुर्लेकरवाडी, वरची कुंभारवाडी येथील प्रकल्पग्रस्त नागरिकांना पूर्वीप्रमाणेच पाच रुपये प्रतिलिटर दराने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली. कोकण रेल्वे प्रकल्पानंतर येथील प्रकल्पग्रस्तांना पुरविले जाणारे पाणी एमआयडीसी पुरवते, मग नगरपंचायत जास्त कर का आकारते, असा प्रश्न करत नगरपंचायतीच्या नव्या धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उपविधीत बदल करून येथील प्रकल्पांना पाणीपट्टी कमी करून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.
कोकण रेल्वे झाल्यामुळे एमआयडीसी व कुडाळमधील काही भागातील पाणी पातळी कमी होत चालली आहे. हेच पाणी एमआयडीसी तीन रुपये दराने नगरपंचायतीला देते. या पाण्याचा दर पूर्वीप्रमाणे नगरपंचायतीने पाच रुपये करावा. सध्या नगरपंचायत नागरिकांना १७ रुपये दराने पाणी देत असून ते परवडणारे नाही. त्यामुळे हा दर पाच रुपये करावा, असे शिंदे म्हणाले. दिव्यांग लाभार्थ्यांना समान निधी देण्यात यावा तसेच कन्याशाळेसमोरील तिठ्याला महात्मा फुले यांचे नाव देण्यात यावे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या चर्चेत सर्व नगरसेवकांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com