
चिपळूणला 6 पासून साहित्यिक मेळावा
चिपळुणात ६ मे पासून साहित्यिक मेळावा
चिपळूण, ता. २४ ः कोकणातील फुले, शाहू, आंबेडकरी, परिवर्तनवादी चळवळीतील साहित्यिकांचा ६ व ७ मे रोजी चिपळूण येथे साहित्यिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रमुख संयोजक सुनील हेतकर यांनी दिली.
कोकणातील फुले, शाहू, आंबेडकरी, परिवर्तनवादी चळवळीतील साहित्यिकांची बैठक ज्येष्ठ साहित्यिक तथा दलित पॅंथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे घेण्यात आली. या बैठकीला कोकणातील प्रमुख साहित्यिक, कलावंत मंडळी उपस्थित होती. कोकणातील आंबेडकरी व परिवर्तनवादी चळवळीतील साहित्यिकांनी एकत्र येऊन फुले, आंबेडकरी साहित्य चळवळीला गती द्यावी, विचारांचे आदानप्रदान व्हावे, निश्चित भूमिका घेऊन काम करावे यासाठी साहित्यिकांचे एक संघटन उभे करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक पवार म्हणाले, नव्या साहित्यिक कलावंतांचे योगदान लक्षात घेता सर्वांना सोबत घेऊन साहित्यिक मंचावर एकत्रितपणे काम करण्याची व अधिकाधिक कसदार व दर्जेदार लेखन घडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत. या बैठकीला साहित्यिक डॉ. श्रीधर पवार, प्रा. आनंद देवडेकर, सुनील हेतकर, पत्रकार संदेश पवार, लेखक रमाकांत जाधव, नारायण कांबळे, प्रदीप नाईक, अभय शेवरी, ॲड. दीपक जाधव, शाहीर मारूती सकपाळ आदी उपस्थित होते. कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि समारोपीय कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिका उर्मिलाताई पवार यांचा सन्मान व समारोपीय भाषण होणार आहे. या कार्यक्रमास नियोजन आयोगाचे माजी सदस्य, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, पत्रकार युवराज मोहिते यांच्यासह चळवळीतील अनेक मान्यवर साहित्यिक, कलावंत, पत्रकार, चित्रकार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुनील हेतकर यांनी तर संदेश पवार यांनी आभार मानले.
असे होतील परिसंवाद
७ मे रोजी पहिल्या सत्रात स्त्री साहित्यावर परिसंवाद होणार असून, त्यात लेखिका-कवयित्री सहभागी होणार आहे. तसेच चळवळीतील नव्या दमाचे कादंबरीकार सुधीर जाधव, कथाकार सिद्धार्थ देवदेकर, कवी सिद्धार्थ तांबे यांचे पुस्तकावरील सादरीकरणही केले जाणार आहे. ''नियतकालिके व पुस्तके निर्मितीची प्रक्रिया, छपाई वितरण या समोरील आव्हाने'' या विषयावर सद्धम्मचे संपादक आनंद देवडेकर, सुनील हेतकर, प्रदीप नाईक हे मनोगत व्यक्त करतील. दुपार सत्रात ''भारतीय संविधान व समकालीन परिस्थिती'' या विषयावर परिसंवाद आहे.
-