38 जागांच्या पोटनिवडणुकीच्या हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

38 जागांच्या पोटनिवडणुकीच्या हालचाली
38 जागांच्या पोटनिवडणुकीच्या हालचाली

38 जागांच्या पोटनिवडणुकीच्या हालचाली

sakal_logo
By

ग्रामपंचायतींच्या ३८ जागांच्या पोटनिवडणुकीच्या हालचाली

राजापूर तालुका ; विविध कारणाने जागा रिक्त

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या ३८ जागांच्या पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने प्रशासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशपत्र दाखल न झालेल्या जागा, सामूहिक राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांसह सभांना सतत गैरहजर राहिल्याने रिक्त झालेल्या जागांचा समावेश आहे.
तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमधील ३८ जागा विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या आहेत. त्यामध्ये काही जागा पंचवार्षिक निवडणुकीच्यावेळी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने रिक्त राहिल्या आहेत तर काही जागा ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेल्या सामूहिक राजीनाम्यामुळे रिक्त राहिल्या आहेत. काही जागा सभांना सतत गैरहजर राहिल्याने रिक्त झालेल्या असून या व्यतिरिक्त अन्य काही कारणांनी रिक्त राहिलेल्या जागांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर पोटनिवडणुका घेण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा ढोल वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संभाव्य निवडणुकांच्यादृष्टीने राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनीही आतापासून मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.
-
संभाव्य पोटनिवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती आणि रिक्त जागा
कोळवणखडी- २ जागा, नाणार-१, झर्ये-५, शेजवली-४, येळवण-१, ओझर-१, हसोळतर्फ सौंदळ-२, वडदहसोळ-१, नाटे-१, दसूर-१, वाल्ये-१, पांगरीखुर्द-२, गोवळ-८, पन्हळेतर्फ सौंदळ-२, अणसुरे-१, दळे-२, चिखलगाव-१, मंदरूळ-१, जवळेथर-१, काजिर्डा-१ .
-
महिला उमेदवार नसल्याने अडचण
रिक्त असलेल्या ३८ जागांमध्ये सुमारे २४ जागा महिलांसाठी राखीव असलेल्या जागांचा समावेश आहे. रिक्त असलेल्या या बहुतांश जागा महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे नव्याने होणाऱ्‍या पोटनिवडणुकीमध्ये महिला उमेदवार शोधण्याचे आव्हान राजकीय पक्षांसह गावातील स्थानिक नेतृत्वासमोर राहणार आहे.