
सोसायट्यांना वेळेत खत पुरवठा करणार
91156
सोसायट्यांना वेळेत खत पुरवठा करणार
विठ्ठल देसाई; कणकवलीत विकास सेवा संस्थांची सभा
कणकवली, ता. २४ : यंदाच्या खरीप हंगामाचे योग्य नियोजन केले आहे. मे महिन्या आधी चांगल्या दर्जाचे भात बियाणे तसेच आवश्यक तेवढा खत पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे विकास संस्थांनी खत विक्री परवाना नूतनीकरण करून घ्यावा. जेणेकरून सोसायट्यांना वेळेत खत पुरवठा करता येईल, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांनी दिली. विकास संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या सभेत श्री. देसाई बोलत होते.
खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ, खारेपाटण सोसायटीचे अध्यक्ष बाळा जठार, शिवडाव अध्यक्ष किरण गावकर, संचालक पंढरी वायंगणकर, अतुल दळवी, विनिता बुचडे, सौ. परब, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी शेणवे, आरसीएफ विभागीय व्यवस्थापक श्रीकृष्ण वराडकर, कृषी उद्योग महामंडळ विभागीय व्यवस्थापक श्री. काळे आदींसह विकास संस्थांचे अध्यक्ष, गटसचिव उपस्थित होते.
प्रकाश सावंत म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजेत. यामध्ये विकास संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावावी. कारण शेतकरी विकास संस्थांच्या थेट संपर्कात असतात.’’
कृषी अधीक्षक संभाजी शेणवे म्हणाले, ‘‘विकास संस्था आणि खासगी उद्योजकांनी परवाने वेळेत रजिस्ट्रेशन करून घ्यावेत. आपले सरकार केंद्रावर जाऊन याबाबत डीबीडी पोर्टलवर जाऊन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. या हंगामात खत विक्री करताना ऑनलाईन स्टॉक पाहूनच खत पुरवठा केला जाणार आहे.’’
आरसीएफचे विभागीय व्यवस्थापक श्रीकृष्ण वराडकर म्हणाले, ‘‘शासनाच्या धोरणानुसार खत पुरवठा केला जातो. विकास संस्थांनी पॉज मशीन आणि लायसन अपडेट करून ठेवावे. खत विक्री झालेल्यांची नोंद पॉ़ज मशीनमध्ये न झाल्यास त्याचा स्टॉक ऑनलाइनला दिसतो त्यामुळे, खत पुरवठा करताना अडचणी येत आहेत. शासनाकडून मिळालेले अनुदान देखील कंपनीला मिळत नाही.’’ कृषी महामंडळाचे श्री. काळे म्हणाले, ‘‘आमच्याकडे कृषी उद्योग खत पुरवठा करण्यासाठी स्टॉक उपलब्ध आहे. आपल्याकडून मागणी आल्यानंतर तातडीने खत पुरवठा करण्यात येईल.’’ सभेत असलदे सोसायटीचे अध्यक्ष भगवान लोके, नाटळ सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर सावंत, फोंडाघाट सोसायटीचे अध्यक्ष राजन नानचे आदींनी विकास संस्थांना येणाऱ्या अडचणी मांडल्या.