
पालिकेसमोर अजूनही 3 कोटी वसुलीचे आव्हान
पान ४ साठी
अजूनही ३ कोटी वसुलीचे आव्हान
आठ दिवसांची डेडलाईन; वसुलीसाठी आजपासून १० विशेष पथके
चिपळूण, ता. २४ ः थकित मालमत्ता कर व अन्य शासकीय करांसह पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. वसुलीचे आठ दिवस शिल्लक असताना अजूनही ३ कोटी मालमत्ता कर व ८० लाख रुपयांची पाणीपट्टी वसुलीचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यामुळे जप्तीची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून, चालू मालमत्ता कर वसुलीसाठी आजपासून नवीन दहा विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
आर्थिक वर्ष संपत आल्याने थकित मालमत्ता कर व अन्य शासकीय कर वसुलीसाठी शासनाकडून चिपळूण पालिकेला कडक सूचना करण्यात आल्या आहेत. थकबाकीची रक्कम वसूल न झाल्यास अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसहित नगर पालिकेला देण्यात येणाऱ्या विविध विकासनिधीवर टाच लावण्याचा इशारा देण्यात आला होता. शासनाकडून अशा स्वरूपाची कारवाई झाल्यास शहरातील विकासात्मक कामांवर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी करवसुलीची धडक कारवाई शहरात सुरू केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच अधिकारी व कर्मचारी करवसुली मोहिमेत सहभागी झाले आहेत.
चिपळूण पालिकेची अद्यापही ३ कोटी मालमत्ता कर आणि ८० लाख पाणीपट्टी कर येणे शिल्लक आहे. मागील थकबाकीदार यांच्यावर आता केवळ अधिकारी यांची टीम बनवून कारवाई केली जाणार आहे. चालू घरपट्टी व पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर विशेष वसुली मोहीम राबवण्यात येणार असून, आजपासून त्याकरिता १० विशेष पथके नेमणूक करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी यांच्या वसुलीसाठी मालमत्ता जप्तीसह नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या ६४ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत तर पाणीपट्टी थकवणाऱ्या १०६ जणांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले आहेत.