
संक्षिप्त-वेंगुर्ले पत्रकार संघातर्फे 27 ला पुरस्कार वितरण
संक्षिप्त
वेंगुर्ले पत्रकार संघातर्फे
२७ ला पुरस्कार वितरण
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न वेंगुर्ले तालुका पत्रकार संघातर्फे पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (ता. २७) सकाळी १०.३० वाजता येथील रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमास जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, वेंगुर्ले निवडणूक नायब तहसीलदार संदीप पानमंद, वेंगुर्ले पंचायत समिती गटविकास अधिकारी मोहन भोई, पालिका मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजन खांडेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. यावेळी मालवणकर कुटुंबीय पुरस्कृत संजय मालवणकर स्मृती पुरस्कार प्रथमेश गुरव यांना, केसरकर कुटुंबीय पुरस्कृत शशिकांत केसरकर स्मृती पुरस्कार अजय गडेकर यांना व काणेकर कुटुंबीय पुरस्कृत अरुण काणेकर स्मृती पुरस्कार योगेश तांडेल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा पत्रकार संघाचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त एस. एस. धुरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव अजित राऊळ यांनी केले आहे.
रेडीत सोमवारपासून
कलशारोहण सोहळा
वेंगुर्ले ः श्री क्षेत्र रेडी येथील श्री गजानन संप्रोक्षण कलशारोहण सोहळा २६ ते २८ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त रविवारी (ता. २६) शांतीपाठ, यजमान शरीरशुद्धी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, गणेशयाग, संप्रोक्षण विधी, नैवेद्य, आरती, सायंकाळी ५ वाजता स्थानिकांचे भजन, रात्री ७ वाजता आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा ''देव झाला गुराखी'' हा नाट्यप्रयोग, २७ ला शांतीपाठ, प्राकारशुद्धी, संप्रोक्षण विधी, कलश संप्रोक्षण, वास्तुयजन, ग्रहयजन, मुख्य होम, नैवेद्य, आरती, सायंकाळी स्थानिकांचे भजन, रात्री ८ वाजता नृत्य व नाटक यांचा मेळ असलेला ''दगडू सावधान'' कार्यक्रम, २८ ला शांतीपाठ, कलशारोहण, बलिदान, पूर्णाहूती, सामुदायिक गाऱ्हाणे, आरती, सायंकाळी ५ वाजता स्थानिकांचे भजन, रात्री ९ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचे ''स्पर्शमणी'' नाटक होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीदेव गजानन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.