
रत्नागिरीचा हापूस पोचला इंग्लंडमध्ये
rat२४१४.txt
- rat२४p३४.jpg-ः
९११६०
रत्नागिरी ः इंग्लंडमध्ये पोचलेल्या आंब्याची पूजा करण्यात आली.
-
रत्नागिरीचा हापूस पोचला इंग्लंडमध्ये
पाडव्याचा साधला मुहूर्त ; १२०० किलो विमानाने पाठवले ; डझनला १६ पौंड
राजेश कळंबटे/सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील आंबा उत्पादन तुलनेत कमी आहे. तरीही मार्च महिन्याच्या मध्यात रत्नागिरी हापूस इंग्लंडला पोचला आहे. येथील एका बागायतदाराकडील आंबा पुण्यातील निर्यातदारामार्फत गुढीपाडव्याच्या दिवशी विमानाने गेल्याची माहिती इंग्लंडमधील फळ व्यावसायिक तेजस भोसले यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली. पहिल्या टप्प्यात बाराशे किलो आंबे आले. लवकरच दुसरी मागणीही नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तेजस हे मुळचे पुण्याचे असून, गेली अनेक वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहेत. आंबा हंगामापूर्वी ते रत्नागिरीतील बागायतदारांची भेट घेतात आणि निर्यातीसंदर्भात चर्चा करतात. रत्नागिरी हापूसला परदेशामध्ये मोठी मागणी आहे. त्यानुसार भोसले यांनी यंदा लवकर हापूस इंग्लंडच्या बाजारात नेण्यासाठी प्रयत्न केले होते. पुण्यातील रायसोनी यांच्यामार्फत रत्नागिरीतून १२०० किलो आंबे विमानाने २१ मार्चला रवाना झाले. गुढीपाडव्याच्या दिवशी २२ मार्चला ते इंग्लंडला पोचले. डझनला १६ पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार १६१० रुपये दर मिळत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा हा दर चांगला असल्याचे तेथील व्यावसायिकांनी सांगितले. गतवर्षी ३०० टन हापूसची भोसले यांनी इंग्लडमध्ये विक्री केली. याबाबत भोसले म्हणाले, इंग्लंडला निर्यात करण्यापूर्वी कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही. फायटो सर्टिफिकेट असेल तर आंबा पाठवता येतो. काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याबरोबर काही प्रमाणात हापूस येत होता; परंतु मोठ्या प्रमाणात रत्नागिरी हापूस प्रथमच आमच्याकडे दाखल झालेला आहे. बागायतदारांकडून दर्जेदार माल मिळाला तर येथील ग्राहकांकडून मागणी वाढत राहील. कोरोनामुळे निर्यातीला आंबा पाठवताना विमान वाहतुकीचे दर किलोला सव्वादोनशे रुपये घेतले जात होते. यंदा हे दर निम्म्यावर आले आहेत. त्याचा फायदा निर्यातदारासह व्यावसायिकांना आणि शेतकऱ्याला होत आहे. रत्नागिरीतील बागायतदारांशी थेट संवाद साधून जास्तीत जास्त हापूस निर्यात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
हापूसपुढे केसरचे आव्हान
यंदा हापूसच्या बरोबरीने केसर आंबा बाजारात दाखल झालेला आहे. केसरची साल जाड असल्यामुळे त्यांच्यावर वातावरणातील बदलांचा परिणाम कमी होतो. उलट हापूसमध्ये साका किंवा अन्य कारणांमुळे खराब होण्याची शक्यता अधिक असते. हापूस आणि केसर बरोबरीने निर्यात होऊ लागले तर ग्राहकांकडून तुलना होऊ शकते, असे भोसले यांनी सांगितले.