
आरटीईअंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 48 अर्ज
आरटीईअंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४८ अर्ज
रत्नागिरी, ता. २५ः राज्यात बालकांना ‘मोफत’ व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. संकेतस्थळाची तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर पालकांकडून अर्ज भरण्यास वेग आला आहे. आतापर्यंत संपूर्ण राज्यातून आरटीईसाठी सुमारे साडेतीन लाख तर जिल्ह्यात १ हजार ४८ अर्ज आले आहेत.
आरटीई कायद्यांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश दिला जात आहे. राज्यभरात ८ हजार ८२८ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत राज्यभरातून ३ लाख ४७ हजार २२ पालकांनी अर्ज भरले आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत यंदा तिप्पट अर्ज आल्याने पालकांची डोकेदुखी वाढली आहे. लॉटरीसह प्रतीक्षायादीतील पालकांना प्रवेशनिश्चितीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १७ मार्चपर्यंत आली होती; मात्र, अनेक पालक अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत. आताही अद्यापही अनेक पालक अर्ज सादर करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा वाढ मिळण्याची शक्यता असून, लॉटरीसाठी एप्रिल महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात ९२ शाळांची नोंद झाली असून, यामध्ये ९२९ जागा रिक्त आहेत. यासाठी १ हजार ४८ अर्ज आले असून, शेवटच्या दिवशी अजून किती भर पडणार यानंतरच याचा अंदाज येणार आहे.