सदरसंगमाचा वेढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदरसंगमाचा वेढा
सदरसंगमाचा वेढा

सदरसंगमाचा वेढा

sakal_logo
By

(१९ मार्च पान दोन)

आख्यायिकांचे आख्यान ...........लोगो

फोटो ओळी
-rat२४p२.jpg ः
९१२९४
कसबा येथील संगम मंदिर
-rat२४p८.jpg ः
91304
जे. डी. पराडकर
-
संगमाचा वेढा !

वेढा पडणे हा शब्द इतिहासाने अधिक प्रचलित केला. एखाद्या गडकिल्ल्याला वेढा पडला की, वेढा फोडण्याची व्यूहरचना केली जायची. वेढा किती मजबूत आहे आणि बाहेर पडण्यासाठी एखादा गुप्त मार्ग असेल तर वेढ्यातून निसटण्याचा प्रयत्न केला जात असे. इतिहासातील वेढ्यांनी पराक्रमाचा इतिहास घडवला. ''वेढा'' या शब्दाशी आमचा संबंध आला तो कसबा गावातील बालपणात..! कसबा गावातील साऱ्या आठवणी हृदयस्पर्शी असल्याने प्रत्येक आठवणीवर एक लेख साकारण्याचा प्रयत्न करतोय.
-

--जे. डी. पराडकर, संगमेश्वर
-

पूर्वीचा पाऊस आणि आत्ताचा पाऊस यामध्ये कमालीचा फरक झालाय. आम्ही कसब्यात असताना पावसाची संततधार सलग दोन दिवस सुरू असल्याचे अनुभव आम्ही अनेकदा घेतलेत. पावसाचे रौद्र रूप कसे असते त्याची अनुभूती आम्ही कसबा या गावात जशी घेतली तशी नंतर घेता आलेली नाही. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ व्यापले की, अंधार पडत आल्याची जाणीव व्हायची. असे वातावरण सलग दोन दिवस राहायचे. शास्त्री आणि अलकनंदा नद्या भयावह रूप धारण करायच्या. पाण्याची पातळी वाढत जायची आणि पुराचे पाणी सर्वत्र पसरू लागायचे. शास्त्रीनदीचे रौद्र रूप पाहायला गेलेले कोणीतरी ओरडत यायचे, ''संगमाला वेढा पडला ......... संगमाला वेढा पडला .......... !'' पावसाळ्यात एकदा तरी संगम मंदिराला वेढा पडायचा. हा वेढा पुराच्या पाण्याचा असे. जलदेवता आतूर होऊन साक्षात भगवान शंकरांना स्वतःहून भेटायला येत असल्याची ही स्थिती असे. संगम मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याची बातमी गावात सर्वत्र पसरली की, आबालवृद्ध त्या झोडपून काढणाऱ्या पावसातही वेढ्याचे अनोखे दृश्य पाहायला गर्दी करत. ''संगमाचा वेढा'' आमच्यासाठी एक हृदयस्पर्शी प्रसंग बनून राहिलाय.
कसबा ही ऐतिहासिक नगरी! या नगरीत घडलेले इतिहासाचे अनेक प्रसंग पुढे अभ्यासाचे, कुतुहलाचे आणि पर्यटनाचे विषय बनले. छत्रपती संभाजी महाराजांना या गावात दगाबाजीने पकडल्याचा कटू इतिहास वगळता या गावाचे ऐतिहासिक-सांस्कृतिक महत्व सर्वदूर पोहोचले आहे. चालुक्य राजांनी शिवमंदिरांच्या उभारणीसाठी कसबा या गावाची निवड केली. यामागे नक्कीच काहीतरी शास्त्रीय कारण असणार हे नंतर विविध दाखल्यांनी स्पष्ट झाले. या गावातील कर्णेश्वर मंदिर हे अप्रतिम शिल्पकला आणि स्थापत्यशास्त्रासाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक शिल्प म्हणजे प्रबंधाचा विषय आहे. कर्णेश्वर मंदिरापासून काही अंतरावर असणारे दुसरे शिवमंदिर म्हणजे ''संगम मंदिर''! या मंदिराचे स्थान हे काशी स्थानाइतकेच महत्वाचे आहे असे इतिहासात दाखले आहेत. शास्त्री, अलकनंदा आणि वरुणा अशा तीन पवित्र नद्यांच्या संगमावर हे शिवमंदिर उभारले गेले असल्याने या मंदिराला संगम अथवा संगमेश्वर मंदिर असे नाव दिले गेले. या मंदिराची रचना म्हणजे चालुक्य राजांच्या अफाट कल्पनाशक्तीची साक्ष पटवणारी आहे. संगम मंदिरातील शिवलिंग सभामंडपातून दिसत नाही. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पायऱ्या उतरून खाली उतरावे लागते. हा सर्व भाग काळोखाचा असल्याने शिवलिंगावर प्रकाश यावा यासाठी एक झरोका ठेवण्यात आला आहे. या झरोक्यातून पुराचे पाणी आतमध्ये गेले की, शिवलिंगावर जलदेवतेचा अभिषेक होतो. या प्रसंगाला ''संगमाला वेढा पडणे'' असे म्हटले जाते. ज्या वेळी या झरोक्यातून पाणी गाभाऱ्यात जाते त्या वेळी मंदिराच्या सभोवताली पुराचे पाणी गोलगोल फिरत असते. पाणी गोल गोल फिरणे म्हणजेच पाण्याचा वेढा पडणे होय. कर्णेश्वर मंदिर आणि संगम मंदिर यांच्या मध्यभागी श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर आहे. या मंदिराच्या प्रांगणात उभे राहून गावातील सारे ग्रामस्थ संगमाला पडणाऱ्या वेढ्याचे ते पवित्र दृश्य एकटक पाहात रहायचे. चालुक्यकालीन स्थापत्य शास्त्रात मंदिरांची रचना करताना जो विचार केला गेला तो अचंबित करणारा आहे. संगम मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शंकरांचे संपूर्ण कुटुंब एकत्र असल्याचे पाहायला मिळते. मध्यभागी शिवलिंग आणि आजूबाजूला पार्वती, गणपती आणि कार्तिकस्वामी यांच्या मूर्ती आहेत. शिवाचे संपूर्ण कुटुंब एकत्र असल्याचे हे दुर्मिळ आणि पवित्र स्थान आहे.
धो धो पडणाऱ्या पावसात छत्री असूनही सर्वांग चिंब भिजून जायचे; मात्र अक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या नद्यांचे वेगवान पाणी त्या झरोक्यातून आतमध्ये जात असताना हे दृश्य पाहणाऱ्या ग्रामस्थांनादेखील जलदेवतेचे दर्शन व्हायचे. कसब्यातून संगमेश्वरला जाणारा मार्गदेखील बंद व्हायचा. एकंदरीत संगमाच्या या वेढ्याचे गावात वर्षानुवर्षे असणारे अप्रुप कायम असल्याचे स्पष्ट होई. एखादी वयस्कर व्यक्ती त्यांच्या बालपणी संगमाला वेढा पडल्यानंतर पाहायला मिळालेल्या आठवणी सांगत असे.
संगमाला वेढा पडल्यानंतर जलदेवतेचा शिवलिंगावर अभिषेक होत असल्याने ते शुभ मानले जायचे. ज्या वर्षी पाऊस कमी पडे त्या वर्षी संगमाला वेढा पडत नसे. कसब्यातून बाहेर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे गाव येथील अशाच वेगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांमुळे कायम स्मरणात राहिलेय. संगम मंदिराजवळ आता घाट बांधण्यात आला असल्याने पर्यटक येथे शांतपणे बसू शकतात. कसबा गाव म्हणजे आमच्या बालपणी साठवलेल्या असंख्य आठवणी. संगमाचा वेढा हा याच आठवणींच्या पोतडीतील एक अविस्मरणीय भाग. आता आम्ही कसबा गावात राहात नसलो तरीही पावसाळ्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो फक्त संगमाचा वेढा!