कुटीर रुग्णालयात अखेर औषध साठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुटीर रुग्णालयात अखेर औषध साठा
कुटीर रुग्णालयात अखेर औषध साठा

कुटीर रुग्णालयात अखेर औषध साठा

sakal_logo
By

कुटीर रुग्णालयात अखेर औषधसाठा

केसरकरांचा पाठपुरावा; रुग्णांचे हाल थांबणार

सावंतवाडी, ता. २५: येथील कुटीर रुग्णालयाला अखेर आज औषध पुरवठा उपलब्ध झाला आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून हा औषध साठा उपलब्ध करून दिला आहे.
गेले काही दिवस कुटीर रुग्णालयात महत्त्वाची औषधे नसल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. औषधे नसल्यामुळे सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना बाहेरून औषधे लिहून द्यावी लागत होती. याबाबत श्री. केसरकर यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. आज हा औषधसाठा करण्यात आला, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी, युवा रक्तदाता संघटना व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान या संघटनांच्यावतीने काल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन औषधांच्या तुटवड्याबाबत चर्चा केली होती. याच पार्श्वभूमीवर केसरकर यांच्याशी संपर्क साधून सुद्धा लवकरात लवकर रुग्णांची होणारी गैरसोय दूर करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर २४ तासांच्या आत दखल घेऊन केसरकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून औषध पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे आता गोरगरीब व मध्यमवर्गीय रुग्णांची महागड्या औषधांकरवी होणारी आर्थिक ओढाताण थांबणार आहे. यासाठी वरील सामाजिक संघटनेंनी विशेष ताकद लावून प्रयत्न केले होते आणि त्यांच्या या प्रयत्नाला आज खूप मोठे यश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आज सर्व प्रकारची औषधे उपलब्ध झाली आहेत आणि ती पुढेही कमी पडणार नाही याची ग्वाही श्री. केसरकर यांनी दिली. यासाठी केसरकर यांचे शहरवासी, ग्रामीणवासी, व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्यावतीने विशेष आभार मानले.