‘गावडोबा कलेश्वर’ची कुडाळात बाजी

‘गावडोबा कलेश्वर’ची कुडाळात बाजी

91445
कुडाळ ः पारंपरिक शिमगोत्सवातील रोंबाट व राधानृत्य लोककलेसह विविध लक्षवेधी देखाव्यांनी हजारो रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. (छायाचित्र ः अजय सावंत)


‘गावडोबा कलेश्वर’ची कुडाळात बाजी

रोंबाट स्पर्धा; पारंपरिक राधानृत्य, चित्ररथ ठरले लक्षवेधी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः पारंपरिक शिमगोत्सवातील रोंबाट व राधानृत्य या लोककलेचे जतन करीत विविध लक्षवेधी देखावे हजारो रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेत गावडोबा कलेश्वर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त येथील तहसील कार्यालयानजीकच्या भव्य क्रीडांगणावर काल (ता. २५) रात्री कोकणची पारंपरिक लोककला रोंबाट व राधानृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक चळवळीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. येथील अनेक लोककलांनी राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डंका गाजवला आहे. येथील शिमगोत्सवाच्या कालावधीतील रोंबाट, पारंपरिक लोककला मनोरंजनाचे माध्यम समजले जाते. या लोककलांना स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहित करावे, या उद्देशाने आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त या रोंबाट राधानृत्यचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध संघांनी लक्षवेधी नावीन्यपूर्ण देखावे सादर करून हजारो रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हा सोहळा उत्तरोत्तर रंगतदार ठरला. पौराणिक कथांवर आधारीत चित्ररथ हे या रोंबाट उत्सवाचे वैशिष्ट्य असते. जवळपास सहा ते सात तास या रोंबाट उत्सवाची वेगळीच मजा रसिकांनी घेतली. ड्रोन कॅमेराच्या नजरेतूनही या उत्सवाचे प्रक्षेपण करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील १६ संघ सहभागी झाले होते. यामध्ये विलास मेस्त्री ग्रुप (नेरुर), आना मेस्त्री ग्रुप (नेरुर), ओंकार मित्रमंडळ (नेरुर), दिनू मेस्त्री ग्रुप (नेरुर), बाबा मेस्त्री राधानृत्य, गावडोबा कलेश्वर ब्राम्हण मित्रमंडळ, रायवाडी, पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ, गावडोबा माड्याचीवाडी समंध मित्रमंडळ, वेतोरे मांडेश्वर मित्रमंडळ, वरची शेळपी गजानन मित्रमंडळ, नेरूर चौपाटी, श्री देव ब्राम्हण राधानृत्य केसरकरवाडी, परुळे भावई मित्रमंडळ, कोचरे कलेश्वर गावडोबा, साईचे टेंब भगवती सान मडव, जांभवडे आदी संघांचा सहभाग होता. या कार्यक्रमात विविध देखाव्यांतून जनजागृतीपर संदेश दिले. यामध्ये श्री देव संमंध मित्रमंडळ वेतोरे-मिरमेवाडी या संघाने ‘मद्य सेवनाचा पाश’ या शीर्षकाखाली ‘शरीर आणि आत्म्याचा एकाच वेळी सत्यानाश’, हे चित्र या देखावेतून व नृत्यातून सादर केले. सेतुबंध श्री रामेश्वर लिंगाची स्थापना, हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारणारा. पारंपरिक राधानृत्यावर आधारीत विविध गीते यामुळे हा सोहळा अधिक रंगतदार ठरला.
...............
चौकट
स्पर्धेतील विजेते
अनुक्रमे गावडोबा कलेश्वर ब्राह्मण पारंपरिक राधानृत्य (नेरूर), श्री देव गावडोबा माड्याचीवाडी, गजानन प्रासादिक मंडळ चौपाटी यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. उत्कृष्ट कलाकारांमध्ये राधा-महेश मडव, भगवती-सान जांभवडे, कृष्ण-शुभम गावडे, श्री देव समंध वेतोरे मारुती-सत्यवान धामापूरकर, श्री देव गावडोबा माडयाचीवाडी-राक्षस: गोटया पाटकर, गजानन प्रासादिक मंडळ, नेरुर नर्तक-श्री कलेश्वर गावडोबा नेरुर सायचे टेंब विशेष कल्पक साँग-होलिका श्री देव समंध वेतोरे (संगीत साथ-श्री देव समंध वेतोरे) यांना देण्यात आले. प्रशांत धोंड, सौरभ पाटकर यांनी परीक्षण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com