काजू दरात घसरण

काजू दरात घसरण

काजू दरात घसरण

रत्नागिरी ः सध्या काजू दरात घसरण होत आहे. बाजारपेठेत काजूचा दर किलोला १२० च्या खाली आला आहे तर गावठी काजूव्यापारी खरेदी करण्यास बघत नाहीत. त्यामुळे काजू बागायतदार वर्ग हैराण झाला आहे. शासनाने काजू बागायतदारांना दिलासा देण्यासाठी काजूला हमीभाव द्यावा तसेच केंद्राने काजूवरील कमी केलेले आयात शुल्क पूर्ववत करावे, अशी मागणी जिल्हा शेतकरी संघटना आणि जिल्हा बागायतदार संघटनेने संयुक्तपणे केली आहे. कोरोनापूर्वी हा दर प्रतिकिलो १५० वर होता; परंतु कोरोना काळात तो ९० रुपयांवर आला. त्यानंतरच्या काळात हा दर १३० रुपयापर्यंत आहे. यंदाही हा दर १३० रुपयापर्यंत गेला होता; परंतु आता तो १२० रुपयापर्यंत आल्याने काजू बागायतदार वर्ग हैराण झाला आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी दोन्ही संघटनांनी केली आहे.
-
फेरीवाल्यांना ६० लाखाचे कर्ज

रत्नागिरी ः कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या रत्नागिरी शहरातील ६०० फेरीवाले, पथविक्रेत्यांना आर्थिकद़ृष्ट्या सावरण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून ६० लाख रुपयांचे खेळते भांडवलरूपी कर्ज देण्यात आले आहे. अजून ८७ पथविक्रेत्यांचे कर्ज प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याचे योजनेचे शहर अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर यांनी सांगितले. कोरोना काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. सन २०२०-२१ या लॉकडाउन काळात छोट्या विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला होता. यावर प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा उपाय महत्वाचा मानला जात आहे. भाजीपाला, फळे, पानटपरी, वडापाव, भेळवाले अशा इतर अनेक छोट्या विक्रेत्यांना उभे करण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना उपयुक्त ठरली आहे. पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा स्थिर करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये खेळते भांडवल कर्जरूपाने देण्यात आले. स्वनिधी योजनेंतर्गत शहरातील ७२४ पथविक्रेत्यांकडून मदतीसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर झाले होते. शहर अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर यांनी या संदर्भात बँकांसोबत विचारविनिमय करून आणि फेरीवाल्यांना मार्गदर्शन करून कर्ज मिळण्यासाठी कर्तव्य बजावले. त्यानुसार बँकांनी ६८७ कर्ज प्रकरणे मंजूर केली असून, ६०० पथविक्रेत्यांना प्रत्येकी १० हजार रूपयांप्रमाणे कर्ज वितरित केले आहे. उर्वरित ८७ प्रकरणे प्रलंबित आहेत.
--

टँकरमुक्तीसाठी कृषी विभाग सरसावला

रत्नागिरी ः उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाई कमी करण्यासाठी आणि जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार मोहीम गतिमान करण्यात आली आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत जिल्ह्यातील धनगरवाड्यांवर पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी महसूल विभाग, पंचायत समिती, वनविभाग, उपअभियंता बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, तालुका कृषी विभागाने टँकर मुक्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या उपक्रमात धनगरवाड्यांवर क्षेत्रीय भेटी देऊन ठिकाण निश्चित करण्यात येत आहे. ग्रामस्थांचा यामध्ये सहभाग घेतला जात आहे. यामध्ये शेतीसाठी पाणी उपयोगी पडेल असे प्रक्षेत्र निवडले जात आहे. यामध्ये सीसीटी, समतल चर, शेततळी, वनतळी, नालाबांध, सिमेंट बांध, माती बांध, लूज बोल्डर यासह टॉप टू बॉटमची कामे केली जाणार आहेत. निवडलेल्या गावात ग्रामस्थांशी संवाद साधून प्रबोधन केले जाणार आहे. प्रत्येक विभागातील अधिकाऱ्‍यांनी आपआपल्या विभागांतर्गत मोहिमेकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. निवडलेल्या गावात पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून पाणलोट तयार करून जमिनीत पाणी मुरवून भूजल पातळी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com