ग्रंथालय चळवळ वाढविणे आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रंथालय चळवळ वाढविणे आवश्यक
ग्रंथालय चळवळ वाढविणे आवश्यक

ग्रंथालय चळवळ वाढविणे आवश्यक

sakal_logo
By

91497
सावंतवाडी ः ग्रंथालयाचे उद्‍घाटन करताना कोमसापचे तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत. शेजारी भरत गावडे, बाळ पुराणिक, राजाराम चिपळूणकर, डॉ. शुभदा करमळकर, शिवानंद भिडे आदी.


ग्रंथालय चळवळ वाढविणे आवश्यक

अॅड. संतोष सावंत ः सावंतवाडीत करमरकर ग्रंथालयाचे उद्‌घाटन

सावंतवाडी, ता. २६ ः आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात वाचन संस्कृती आणि वाचक कमी होत आहेत, असे काही जण म्हणू लागले आहेत; मात्र काळ कितीही बदलला तरी वाचक कधीही बदलत नाही, तो वाचतच असतो. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपणही बदलायला हवे. जुन्या-नव्याची सांगड घालून तरुणाईला वाचन, साहित्य, ग्रंथालय चळवळीकडे वळविण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी केले.

सावंतवाडी-भटवाडी येथील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेच्या शशिकला माधव करमरकर ग्रंथालयाचे नूतनीकरण करण्यात आले. या पुनर्जीवित ग्रंथालयाचे उद्‌घाटन ॲड. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी सरस्वती देवी, भगवत गीता यांचे विधीवत पूजन वेदमूर्ती भूषण केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अध्यापक संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा कोमसाप जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, डॉ. शुभदा करमळकर, जिल्हा ब्राह्मण संघाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम चिपळूणकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष बाळ पुराणिक, सचिव शिवानंद भिडे, खजिनदार गणेश दीक्षित, चंद्रकांत घाटे, घनःश्याम गणपुले, विश्वेश्वर कोळंबेकर, अनुजा भागवत, रवींद्र गगनग्रास, सुरेश पुराणिक, जनार्दन भागवत, भालचंद्र कशाळीकर, ब्राह्मण संस्थेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रसाद मराठे, चिंतामणी मुंडले, गुरुदास देवस्थळी, वैभवी पुराणिक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पुराणिक म्हणाले, जुन्या ग्रंथालयाला संस्थेने पुनर्जीवित केले आहे. बदलत्या काळानुसार ग्रंथालय सर्वांसाठी खुले करण्यात आले असून या ग्रंथालयात संस्कृत पाठशाळा वर्ग आणि शासनाच्या माध्यमातून एक संस्कृत पठण केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. वक्तृत्व, लेखन आदी विविध स्पर्धा येत्या काळात घेण्यात येतील. ग्रंथालयासाठी वेगळी पाच जणांची कमिटी नियुक्त करून ग्रंथालयाचा वेगळ्या पद्धतीत विकास केला जाईल. सभासद संख्या वाढविण्यात येईल.
भरत गावडे म्हणाले, ‘‘‘वाचेल तो वाचेल’, या संत रामदास स्वामींच्या तीन शब्दांत मोठा अर्थ सामावला आहे. वाचन ही काळाची गरज असून टिपणी करून ठेवल्यास आपण काय वाचतो, याचे आकलन होईल, असे मार्गदर्शन केले. या ग्रंथालयाला साने गुरुजींची पुस्तके भेट म्हणून देणार आहे.’’
डॉ. करमळकर यांनी आमच्या कुटुंबीयांच्या नावे हे ग्रंथालय सुरू होत असून ते निश्चितपणे नवी वाचन चळवळ निर्माण होईल, असे सांगून ग्रंथालयाला पाच हजार रुपयांच्या पुस्तकांची भेट जाहीर केली. राजाराम चिपळूणकर यांनी सर्वांनी प्रयत्नांतून ग्रंथालय एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवावे, असे आवाहन केले. सचिव भिडे यांनी संस्थेची धुरा या नव्या कमिटीच्या हाती आल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी हे जुने ग्रंथालय नव्या धरतीवर उभे करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. हे ग्रंथालय सर्वांसाठी वाचनीय ठरावे, असे नियोजन केल्याचे ते म्हणाले. विनायक गाडगीळ यांनी आभार मानले.
--
ग्रंथालयात हवेत संस्कृत वर्ग
ॲड. सावंत पुढे म्हणाले, ‘‘गावागावांत, शहरात ग्रंथालये आहेत; पण या ग्रंथालयात संस्कृत आणि भगवद् गीता आदी आजच्या काळात वाचायला हवीत, अशी सर्व आगळीवेगळी पुस्तके आहेत. या ग्रंथालयाचा लाभ सर्वांनी घ्यावा. हे ग्रंथालय महाराष्ट्रात एक संस्कृत तसेच सर्व सुविधांयुक्त ग्रंथालय म्हणून ओळखले जाईल. मोबाईल, व्हॉट्सअप, गुगल आदी नवतंत्रज्ञानाचा उपयोग करून बदलत्या परिस्थितीनुसार ग्रंथालय चळवळ पुढे न्यायला हवी. येथे संस्कृत वर्ग केंद्र सुरू करावेत, त्यासाठी कोमसापच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’