कोकणातील विद्यार्थी शिक्षणात अग्रेसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातील विद्यार्थी शिक्षणात अग्रेसर
कोकणातील विद्यार्थी शिक्षणात अग्रेसर

कोकणातील विद्यार्थी शिक्षणात अग्रेसर

sakal_logo
By

91496
सावंतवाडी ः येथे संवाद बैठकीत बोलताना मान्यवर. व्यासपिठावर इतर.


कोकणातील विद्यार्थी शिक्षणात अग्रेसर

विकास सावंत; सावंतवाडीत संवाद बैठकीचे उद्‍घाटन

सावंतवाडी, ता. २६ ः आजच्या काळात ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मुक्त विद्यापीठासारखी माध्यम उपलब्ध आहेत, ही समाधानाची बाब आहे. कोकणातील विद्यार्थी गरीब असले तरी शिक्षणात मात्र नेहमीच अग्रेसर आहेत, असे मत शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांनी मांडले.
आरपीडी ज्युनिअर कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विभागीय केंद्र कोल्हापूर आयोजित केंद्रप्रमुख, केंद्रसंयोजक, सहाय्यक व तांत्रिक सहाय्यक संवाद बैठक डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, अभ्यास केंद्र सावंतवाडी येथे आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक प्राचार्य डॉ. बाळासाहेब लाडगांवकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही. व्ही. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, प्राचार्या ठाकूर, डॉ. शिंदे, संजय काटे, श्री. गाडे उपस्थित होते. या बैठकीत विभागीय संचालक प्राचार्य डॉ. लाडगांवकर यांनी उपस्थित अभ्यासकेंद्रातील प्रशासकीय प्रवर्गाला मार्गदर्शन केले. अभ्यासकेंद्रांना दिलेल्या भेटीमुळे बऱ्याच बाबींची बैठकीमध्ये चर्चा करता आली. नवीन शैक्षणिक धोरण, परीक्षा कामकाज प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी कशा दूर करता येतील व विद्यार्थी संख्या कशी वाढवता येईल, याबद्दल या संवाद बैठकीत विभागीय संचालकांनी चर्चा केली. आपल्या संशोधक दृष्टीतून काही अभिनव उपक्रम राबवता येतील तसेच आपल्या प्रदीर्घ अनुभवातून विद्यापीठाची अभ्यासकेंद्रे अधिक सक्षम कशी करता येतील, याबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले. वंचितांसाठी मुक्त विद्यापीठाची द्वारे नेहमीच खुली असतात याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पूर्वतयारी शिक्षणक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबद्दलची भूमिका स्पष्ट केली. केंद्राच्या वाढीसाठी किंवा विकासासाठी काय करता येईल, याबद्दल यावेळी चर्चासत्रही झाले. यामध्ये कृषी महाविद्यालय तसेच बॅ. खर्डेकर महाविद्यालय, बॅरिस्टर नागपूर कॉलेज, डॉ. जे. बी. नाईक कॉलेज, साहेब रिसर्च सेंटर आधी अभ्यास केंद्राने सहभाग घेतला.
डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स अभ्यास केंद्राच्यावतीने विभागीय संचालकांना श्री. सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ‘इंद्रधनुष्य’ या आंतर विद्यापीठाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ठसा उमटवणाऱ्या प्रशांत काजरेकर, साबाजी वारंग, सिद्धांत तळवडेकर यांचा विभागीय संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या संवाद बैठकीमध्ये कृषी महाविद्यालयच्या केंद्रप्रमुखांनी तसेच बॅ. खर्डेकर महाविद्यालय अभ्यास केंद्राच्या केंद्र संयोजकांनी सहभागी होऊन प्रश्न उत्तराची चर्चा केली. डॉ. सुमेधा नाईक व प्रा. मिलिंद कासार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संतोष वालावलकर यांनी आभार मानले. विभागीय केंद्राच्या संवाद बैठकीचे व्यवस्थापन प्रा. केंद्र संयोजक तुषार वेंगुर्लेकर आदींनी केले.
--
अभ्यासपूर्ण वाटचाल आवश्यक
श्री. सावंत यांनी आजच्या काळात ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मुक्त विद्यापीठासारखी माध्यम उपलब्ध असल्याबद्दल समाधान व्यक्त करून ग्रामीण भागातील अभ्यासकेंद्रांचे त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अभिनंदन केले. इथला तरुण गरीब असेल मात्र शिक्षणात नेहमीच अग्रेसर असतो, असे ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपण अभ्यासपूर्ण वाटचाल केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.