शिक्षकांना व्यक्तिमत्त्व घडविण्याचे भाग्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांना व्यक्तिमत्त्व घडविण्याचे भाग्य
शिक्षकांना व्यक्तिमत्त्व घडविण्याचे भाग्य

शिक्षकांना व्यक्तिमत्त्व घडविण्याचे भाग्य

sakal_logo
By

91500
कट्टा ः मुख्याध्यापक विजय गावकर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देताना अॅड. देवदत्त परुळेकर, किशोर शिरोडकर, जगदीश नलावडे, मुख्याध्यापक संजय नाईक.


शिक्षकांना व्यक्तिमत्त्व घडविण्याचे भाग्य

अॅड. देवदत्त परुळेकर; कट्टा येथे पुरस्कार वितरण उत्साहात

ओरोस, ता. २६ ः प्रा. मधू दंडवते हे उत्तम शिक्षक होते. विज्ञान आणि शिक्षण यांची सांगड असलेला प्रा. दंडवते यांच्या नावाने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार आज वितरीत करीत असताना मनापासून आनंद होत आहे. कारण शिक्षकाला ज्ञानदानातून मोठा आनंद मिळतो. हे समाधान अन्य कुठल्या क्षेत्रात मिळत नाही. असंख्य व्यक्तिमत्त्व घडविण्याचे भाग्य शिक्षकांना मिळते. विद्यार्थ्यांबद्दल प्रेम, आस्था शिक्षकांना असते. त्यामुळे हे पुरस्कार वितरित करताना विचारांची प्रेरणा आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान करण्यात येत आहे, असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर यांनी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा येथे प्राध्यापक मधु दंडवते आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
बॅ. नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने प्रा. दंडवते यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सौ. हि. भा. वरसकर विद्यालय वराडचे मुख्याध्यापक टी. के. पाटील व भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय गावकर यांना मधु दंडवते स्मृति आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. त्याचे वितरण काल (ता.२५) दुपारी तीनला बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा शाखा कार्यालयात करण्यात अॅड. परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. हे पुरस्कार वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कट्टा मुख्याध्यापक संजय नाईक, शिवाजी इंग्लिश स्कूल काळसे मुख्याध्यापक टी. एस. पेडणेकर यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले. यावेळी मालवण सेवांगण कार्याध्यक्ष दीपक भागटे, कट्टा शाखा अध्यक्ष किशोर शिरोडकर, शाम पावसकर, बाळकृष्ण नांदोसकर, अपना बाजार डायरेक्टर जगदीश नलावडे, सिंधू नलावडे, सौ. गावकर, विजय चौकेकर, विनोद आळवे, बापू तळावडेकर, श्रीधर गोंधळी, सदाशिव गावडे, सुजाता पावसकर, वैष्णवी लाड, दिपाली नाईक, प्रसाद परुळेकर, पंडित माने, माधवी मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी माधवी मेस्त्री यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी भोगटे यांनी ११ नोव्हेंबर २०२२ ते ११ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रा. मधू दंडवते यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त १०० कार्यक्रम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त उपक्रम झाले आहेत. बॅ. नाथ पै यांचे व्यक्तिमत्त्व फार मोठे होते. १९९९ पासून शाखेच्यावतीने अविरत स्कॉलरशिप मार्गदर्शन वर्ग सुरू आहे. हे काम २४ वर्ष अविरत सुरू आहे. त्याला मुख्याध्यापक विजय गांवकर आणि टी. के. पाटील यांनी मुलांना शिकविण्याचे काम केले. त्यासाठी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुरस्कार देवून मुख्याध्यापक गांवकर, पाटील यांचा सत्कार करीत आहोत, असे सांगितले. मुख्याध्यापक टी. एस. पेडणेकर यांनी विचार मांडले. यावेळी शिक्षक प्रसाद परुळेकर, पंडित माने यांच्यासह जगदीश नलावडे, सदाशिव गावडे यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचलन वैष्णवी लाड यांनी केले. आभार बाळकृष्ण नांदोसकर यांनी मानले.
--
मान्यवरांची मनोगते
गांवकर म्हणाले, ‘‘छोट्या छोट्या बजावलेल्या सेवांची दखल घेऊन हा सन्मान मिळाला आहे. सहकाऱ्यानी कौतुक केले. त्यामुळे खूपच समाधान झाले. आजच्या काळात कोणत्याही गोष्टीचे टेन्शन न घेता ते पूर्ण करणे योग्य आहे. प्रामाणिकपणा कायम ठेवाला हवा. हा परिसर नाथ पै यांच्या विचारसरणीचा पगडा असलेला भाग आहे. घरातील पुरस्कार असल्याने अधिकच समाधान वाटते.’’ श्री. पाटील म्हणाले, "आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचे काम आपण केले पाहिजे. मुख्याध्यापक यांच्याकडे व्हिजन पाहिजे. तरच तो मिशन करू शकतो. मी घाटावरचा असलो तरी माझ्यावर झालेले संस्कार येथील आहेत. शिक्षण तिकडे झाले तरी घडलो."