
रस्त्याच्या दूरूस्तीबाबत अनास्था
- rat२६p२९.jpg-
९१५३८
रत्नागिरी ः रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अवस्था
-
रेल्वेस्टेशन रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनास्था
प्रवाशांमध्ये नाराजी ः दुतर्फा वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता
रत्नागिरी, ता. २६ ः येथील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली आहे. नवीन रस्ता न करता वारंवार केवळ खड्डे भरण्याचे काम केले जाते. कोकण रेल्वेचे लाखो प्रवासी रत्नागिरी-हातखंबा या मुख्य मार्गावरून रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे या रस्त्यावरून वाहने, एस टी. रिक्षाद्वारे ये-जा करीत असतात. रस्ता नुतनीकरण करण्याबाबत अनास्था असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीतून मुंबईकडे कोकण रेल्वेने जाणार होते. त्यावेळी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या एकेरी मार्गाचे डांबरीकरण करून दिले. मात्र पलीकडच्या रेल्वे स्थानकाकडून मेन रोड कडे येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले नाही. त्यामुळे काम केलेल्या एकेरी मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू असून अपघाताचा धोका वाढला आहे. रेल्वे फाट्यावरच पोलीस चौकी असूनही या चुकीच्या वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुर्दशा झाली होती. मात्र कोकण रेल्वे गेली पाच वर्षे या रस्त्यावर दगड आणि मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करत होती. यातून कोकण रेल्वेचा कंजूस पणा दिसून येत होता. अखेर दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना रात्री कोकण रेल्वेने मुंबईकडे जाणार असल्याने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे डांबरीकरण करून दिले मात्र पलीकडच्या रेल्वे स्थानकाकडून मेन रोड कडे येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले नाही. एका बाजूचे डांबरीकरण शासनाकडून फुकट करून मिळाले मात्र रेल्वे स्थानकाकडून येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले न गेल्याने हा रस्ता पूर्वीचाच खड्डे असलेला आणि मलमपट्टी केलेला तसाच राहिला कोकण रेल्वे कडे पैसा असूनही या दुसऱ्या मार्गावरील डांबरीकरणाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्याचाच फायदा रिक्षा चालक आणि अन्य खाजगी वाहन चालक या खडबडीत रस्त्याने मुख्य रस्त्याकडे येण्याऐवजी डांबरीकरण केलेल्या मार्गावरून राजरोस वाहतूक करून वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करीत आहेत. दुतर्फा वाहतुकीमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस वाहतूक शाखेने या नियमबाह्य बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी केली जात आहे.