
टीएआयटी निकालामुळे शिक्षक भरतीकडे लक्ष
टीएआयटी निकालामुळे शिक्षक भरतीकडे लक्ष
डीएड्, बीएड्धारक ः परीक्षा शिक्षकांसाठी की बँक अधिकाऱ्यांसाठी
रत्नागिरी, ता. २६ ः शिक्षक भरतीसाठी झालेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा (टीएआयटी) निकाल शुक्रवारी (ता. २४) जाहीर झाला.अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तीस हजार शिक्षकांची पदभरती व विभागीय स्तरावर भरती करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात रिक्त पदे किती भरली जाणार याकडे डीएड्, बीएड्धारकांचे लक्ष लागले आहे.
राज्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत, ती भरणार कधी या मुद्द्यांवरून अधिवेशनांमध्ये शिक्षणमंत्री केसरकर यांना अनेक लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना केसरकर यांनी सुमारे ३० हजार पदांची भरती करण्याची प्रक्रिया राबवण्याबाबत आश्वासन दिले. त्यानुसार परीक्षा परिषदेकडून आयबीपीएस कंपनीकडून २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने टीएआयटीची परीक्षा घेण्यात आली. राज्यातील २ लाख १६ हजार ४४४ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आहे. आता निकालही लागला असून प्रत्यक्ष जागा किती भरणार, आणि विभागीय शिक्षक भरतीचा शासन निर्णय कधी निर्गमित होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी २०१७ मध्ये २४ हजार पदांची घोषणा केली. त्यानंतर सुमारे १२ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया झाली. प्रत्यक्षात मात्र साडेचार ते पाच हजार पदांची भरती झाली. अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ५ वर्षे झाली तरी २०१७ ची भरती अद्याप सुरूच आहे. आता मंत्री केसरकर यांनी घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यंदाच्या भरती परीक्षेत रिझनिंगवर (तर्क व अनुमान) मोठ्या प्रमाणात भर देण्यात आल्याने ही परीक्षा शिक्षकांसाठी आहे की बँकेच्या अधिकाऱ्यांसाठी आहे असा प्रश्न उमेदवारांतून करण्यात येत होता.
-
विभागीय भरतीसाठी कोकणातून एल्गार
परजिल्ह्यातून कोकणात नोकरीसाठी यायचे आणि काही वर्षांनी बदली करून जायचे, असे प्रकार कोकणात सुरू असल्याने जिल्हा बदलीची समस्या वाढली आहे. रत्नागिरीत १३०० जागा रिक्त असून ७०० शिक्षक जिल्हा बदली करून जाणार आहेत. हीच स्थिती रायगड, सिंधुदुर्गमध्ये आहे. त्यामुळे विभागीय भरती करून स्थानिकांना न्याय द्यावा, यासाठी कोकणातील आंदोलने सुरू झाली असून शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप गराटे, भाग्यश्री करंडे, संदेश रावणंग, प्रभाकर धोपट असे सांगितले.