
रस्ते चकाचक
खेडमध्ये श्री सदस्यांनी केले रस्ते चकाचक
खेड ः खेड मधील वेरळ येथील बैठकीतील २०५ श्री सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने खेड ते भरणे या दीड किमी रस्त्याच्या व श्रीक्षेत्रफळ नगर ते चाकाळे बस स्टॉपपर्यंतच्या २ किमी असे एकूण ३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता करत रस्ते चकाचक केले. २ टन व ५ टन असा एकूण ७ टन कचरा गोळा करून त्याचे विघटन करून दुतर्फा रस्ते चकाचक केले.
--
मॅटवरील कब्बड्डी सराव शिबिराला प्रारंभ
खेड ः महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे येथील क्रांतिज्योती महिला प्रतिष्ठानच्या वतीने ३० मार्च ते ५ मे या कालावधीत पुणे-बालेवाडी येथे युवा पुरुष गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील रत्नागिरी जिल्ह्याच्या सहभागासाठी डेरवण येथे झालेल्या खेळाडू निवड शिबिरातून जिल्हा संघासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात आली. खेळाडूंचे सराव शिबिर काळकाई मंदिर येथे सुरू झाले आहे. शिबिराच्या उद्घाटनाला भरणेचे सरपंच संदीप खेराडे, काळकाई मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सचिन जाधव, देवस्थान सचिव सुजित शिंदे, देवस्थान कार्यकारिणी सदस्य अंकुश भुवड, सुरेश धुमाळ आदी उपस्थित होते.
--
भरणे तायक्वाँदो स्पोर्टसचे दोघे जिल्हा संघात
खेड ः भरणे तायक्वाँदो स्पोर्टसच्या वेदिका मोरे व कार्तिक चव्हाण यांची जिल्हा तायक्वाँदो संघात निवड झाली आहे. डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत दोघांनी यश प्राप्त केले. मुलींच्या ३२ किलो वजनी गटात वेदिका मोरे तर मुलांच्या ४१ किलो वजनी गटात कार्तिक चव्हाण यांची जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे. दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक कृणाल चव्हाण, अय्याज मुरूडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तायक्वाँदो असोसिएशन अध्यक्ष अविनाश बर्गे, राज्य कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर करा महासचिव मिलिंद पठारे, भरणे चे विनय तोडणकर आदींनी दोघांचे कौतुक केले.
-
समर्थ स्कूलची आंतराष्ट्रीय कला स्पर्धेत चमक
खेड ः रत्नागिरी येथील ग्लोबल स्कूलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कला स्पर्धेत वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी बक्षिसांची लयलूट केली. आठवीतील गौरांग साळुंखेने हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
तिसरीतील त्रिशा चाळके, बारावीतील राणी जाधव यांना स्पेक्टाक्युलर परफॉर्मन्स पुरस्कार देण्यात आला. तिसरीतील आयुष पवार, आराध्या चव्हाण, चौथीतील भावेश पिंपळकर, सहावीतील अभिज्ञ भणसे, बारावीतील तृप्ती गौडा यांना इमर्जिंग युथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. आठवीतील भूमी पाटील, ऋषी कदम यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली. विद्यार्थ्यांना प्रियांका सागवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. एस. एस. अली, पर्यवेक्षक ए. एच. घोसाळकर आदी उपस्थित होते.