जिल्ह्यात ५९५ कामांसाठी ३६ कोटी

जिल्ह्यात ५९५ कामांसाठी ३६ कोटी

91684

जिल्ह्यात ५९५ कामांसाठी ३६ कोटी

पालकमंत्र्यांकडून मंजूरी; ग्रामीण भागातील प्रलंबित कामांना चालना

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २७ ः जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधा, नागरी सुविधा आणि ‘क’ वर्ग यात्रास्थळ विकासासाठी ३६ कोटी ७० लाख रुपये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला आहे. यातून एकूण ५९५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील मूलभूत व प्रलंबित राहिलेल्या विकासकामांना चालना मिळणार आहे.
जिल्हा नियोजन मंडळाकडून कार्यान्वित केलेल्या जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी ग्रामपंचायतींना जन सुविधेसाठी विशेष अनुदान म्हणून निधी दिला जातो. जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधेसाठी विशेष अनुदान निधी दिला जातो. याचप्रमाणे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘क’ वर्ग यात्रास्थळांचा विकास करण्यासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. त्यानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी या तिन्ही योजनांसाठी ३६ कोटी ७० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दहन-दफन भूसंपादन, चबुतऱ्याचे बांधकाम, शेडचे बांधकाम, पोहोच रस्ता, संरक्षक भिंत, दहन-दफन भूमीत विद्युतीकरण, आवश्यकतेनुसार विद्युत दाहिनी, सुधारीत शवदाहिनी, स्मशान घाट, नदी घाट, जमीन सफाटीकरण, स्मृती उद्यान, नवीन ग्रामपंचायत इमारत व अंतर्गत सुविधा, जुन्या इमारतींची पुनर्बांधणी व विस्तार, ग्रामपंचायत इमारत परिसर सुधारणा, ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार विकसित करणे, गाव तलावातील गाळ काढून तलावाचे सुशोभीकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे, भूमिगत गटार बांधणे, अस्तित्वात असलेल्या विहिरींवर सौर ऊर्जेवर आधारीत दुहेरी हातपंप बसविणे तसेच जलशुद्धीकरण ‘आरओ प्लांट’ बसविणे, गावांतर्गत रस्ते बनविणे, एक वाडी ते दुसरी वाडी रस्ता जोडणे आदी कामे जन सुविधा योजनेंतर्गत केली जातात.
नागरी सुविधा योजनेंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना विकास निधी दिला जातो. बाजारपेठ विकास करणे, बागबगीचे-उद्यान करणे, अभ्यास केंद्र, वाचनालय, विरंगुळा केंद्र, ग्राम सचिवालय, गावांतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, छोट्या ओढ्यावर घाट, साकव, सार्वजनिक दिवाबत्ती, बंदिस्त गटार, चौक सुधारणा या कामांसाठी निधी दिला जातो. एकूण खर्चाच्या ९० टक्के निधी जिल्हा वार्षिक योजनेतून दिला जातो. तर १० टक्के निधी ग्रामपंचायतीने आपला हिस्सा म्हणून त्यात भरायचा असतो. त्याचप्रमाणे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘क’ वर्ग यात्रास्थळांचा विकास योजनेतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मंदिरांचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
---
जनसुविधांसाठी विशेष अनुदान
जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधांसाठी विशेष अनुदान म्हणून २४ कोटी ५० लाख एवढा निधी दिला आहे. यातून ४१३ कामे मंजूर केली आहेत. नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान योजनेसाठी ७ कोटी ८० लाख रुपये मंजूर आहेत. यातून १३६ कामे घेण्यात आली आहेत. तर ‘क’ वर्ग यात्रास्थळांचा विकास योजनेअंतर्गत ४ कोटी ४० लाख रुपये मंजूर आहेत. एकूण ४६ कामे योजनेतून मंजूर केली आहेत.
.............
कोट
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, निमंत्रित सदस्य, सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींनी केलेल्या मागणीनुसार २०२२-२३ मध्ये तिन्ही योजनांतर्गत कामे मंजूर करण्यात आली आहेत.
- विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com