सावंतवाडी पालिकेची आर्थिक कोंडी

सावंतवाडी पालिकेची आर्थिक कोंडी

सावंतवाडी पालिकेची आर्थिक कोंडी

तीन कोटींचा बोजा; तिजोरीत खडखडाट, विकासकामांवरही परिणाम

रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः येथील पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. विकासकामांसाठी स्व-फंडातून दहा टक्के निधी खर्च करणे तसेच विद्युत बिल आदींचा तब्बल तीन कोटीचा बोजा पालिकेवर आहे. तिजोरीत असलेला खडखडाट लक्षात घेता ही आर्थिक कोंडी फोडणार कशी? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यातील पालिकांपैकी सावंतवाडी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून गणली जाते; मात्र असे असले तरी कोरोना काळानंतर पालिकेची आर्थिक स्थिती काहीशी कमकुवत झाली आहे. एकीकडे शासनाकडून विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी दिला जातो; मात्र हा निधी देताना संबंधित पालिकेला स्व-फंडातून दहा टक्के निधी त्या विकासकामांवर खर्च करावाच लागतो. त्यामुळे पालिकेकडे स्व-निधी उपलब्ध असो की नसो तो संबंधित विकासकामांसाठी द्यावाच लागतो. सद्यस्थितीत सावंतवाडी पालिकेच्या कक्षेत विविध विकासकामे मंजूर आहेत. यामध्ये भाजी मंडईचे काम तब्बल १२ कोटींपेक्षा जास्त आहे. त्यानंतर नगरोत्थानमधून मंजूर झालेली कामे सात कोटी पेक्षा जास्त आहेत. या सर्व कामांवर पालिकेला स्व-फंडातून दहा टक्के निधी खर्च करावा लागत आहे. मुळात पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना हा निधी उपलब्ध करावा कसा? हा प्रश्न सध्या पालिकेसमोर आहे. त्यात शहरातील स्ट्रीट लाईट, हायमास्ट व इतर विद्युत बिलांचे तब्बल ६२ लाख रुपये थकीत आहेत. शिवाय इतर काही देणी पालिकेला आहे. या सर्व रकमेचा आकडा जुळवता जवळपास तीन कोटींवर जातो. पालिकेचा उत्पन्नाचा मार्ग तसा काहीसा सक्षम नाही. म्हणजेच घरपट्टी, पाणीपट्टी व व्यापारी गाळे, इतर मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न पाहता पालिकेचा आर्थिक गाडा सुरळीत सुरू राहायचा; मात्र सद्यस्थितीत पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे.
पालिकेची २०२२-२३ या आर्थिक वर्षाची कर मागणी ही दोन कोटी ४६ लाख ९४ हजार ७४४ इतकी आहे. त्यात कराची थकबाकी ही दरवर्षी असतेच. जवळपास ८५ ते ९० टक्के कर वसुली होते. शहरात ३ हजार ४०० नळधारक आहेत. यातून मिळणारी पाणीपट्टी ही एक कोटी ६३ लाख इतकी आहे; मात्र येथेही थकबाकी राहते. जवळपास ९० टक्के वसुली होते. इतर मालमत्ता उत्पन्नातून पालिकेला आर्थिक मदत होते. ती रक्कमही लाखोंच्या घरात असते. कररुपी मिळणारे उत्पन्न हे शहरातील अन्य कामांसाठी वापरले जाते. सद्यस्थितीत कर वसुली मोठ्या प्रमाणात सुरू आहे; मात्र हा निधी आर्थिक कोंडी फोडण्यासाठी वापरल्यास पालिकेसमोर पुन्हा एकदा आर्थिक प्रश्न उपस्थित होणार आहेत. कर रुपये उत्पन्नातून विविध विकासकामे तसेच अन्य आर्थिक ताळमेळ सुरू असतात. त्यामुळे हा निधी खर्च करणे अवघडच आहे. त्यामुळे पालिकेचा तीन कोटीची ही आर्थिक कोंडी नेमकी कशी फोडणार? हा मोठा प्रश्न आहे.
---------
चौकट
करवाढ, विरोध आणि स्थगिती
येथील पालिका प्रशासनाकडून अलीकडेच घरपट्टी, पाणीपट्टी वाढीसंदर्भात निर्णय घेतल्यानंतर शहरातील राजकीय पुढाऱ्यांकडून याला जोरदार विरोध झाला. सर्वपक्षीयांनी यावर एक मत करत ही घरपट्टी अन्यायकारक असल्याचे सांगून हा निर्णय मागे घ्या, अशी जोरदार मागणी केली. खुद्द स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घरपट्टी, पाणीपट्टी वाढीबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले व जिल्हाधिकारी मार्फत दरवाढी स्थगिती आणून ती रद्द करण्यात आली. भविष्यात पालिकेच्या उत्पन्नाचा सोर्स वाढला नाही तर विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच येथील स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री केसरकर हे आत्ताची ही कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
----------
कोट
सावंतवाडी पालिका तीन कोटी रुपयांच्या बोजाखाली आहे. हा इतका निधी नेमका कसा उभा करावा, हा मोठा प्रश्न आहे. पालिकेच्या उत्पन्नाचा विचार करता ही कोंडी फोडणे शक्य नाही. तरीही आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
- जयंत जावडेकर, मुख्याधिकारी, सावंतवाडी पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com