
चिपळूण ः मुरादपुरातील महिलांची पालिकेवर धडक
फोटो ओळी
- ratchl२७२.jpg ःKOP२३L९१७०२ चिपळूण ः मचूळ पाणीप्रश्नी पालिकेवर धडकलेल्या महिला.
-----------
मुरादपुरातील महिलांची पालिकेवर धडक
मचूळ पाणीपुरवठा ; खेर्डी जॅकवेलमधून पाणीपुरवठ्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील गोवळकोट येथील जॅकवेलमधून मचूळ व खारट पाणी पुरवले जात आहे. याबाबत वेळोवेळी दाद मागूनही पालिकेने दखल घेतली नाही. अखेर संतापलेल्या मुदारपूर भोईवाडा येथील महिलांनी सोमवारी (ता. २७) नगरपालिकेवर धडकल्या. खेर्डी जॅकवेलमधून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले.
सध्या गाळ उपशाच्या कामामुळे वीजनिर्मितीनंतरचे पाणी वाशिष्ठी नदीला कमी प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यातच उधाण मोठ्या प्रमाणात असल्याने भरतीचे पाणी वाशिष्ठीत शिरते. गोवळकोट येथील वाशिष्ठी नदीवरील जॅकवेलमधून तेच पाणी उचलून शहराला पुरवले जाते. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेनंतरही या पाण्याच्या चवीत बदल होत नाही. खारट व मचूळ चवीमुळे हे पाणी पिण्यास अयोग्य असताना शहरातील नागरिकांना नाइलाजास्तव हेच पाणी प्यावे लागते आहे.
शहरातील गोवळकोट, पेठमाप, मुरादपूर भोईवाडा, उक्ताड आणि बाजारपेठेतील काही भागास गोवळकोट जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षीच हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करूनदेखील नगर पालिकेकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे तसेच रात्री-अपरात्री कधीही पाणीपुरवठा केला जातो. तोही कमी दाबाने पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अर्ध्या भागास मचूळ खारट पाण्याचा पुरवठा सुरू आहे. यावरून संतापलेल्या मुरादपूर भोईवाडा येथील महिला व नागरिकांनी नगर पालिकेवर धडक देत जाब विचारला. मचूळ, खारट पाणी पिण्यास योग्य नाही. शुद्ध पाणीपुरवठा होणार कधी? नियमितपणे जारमधील पाणी विकत घेणे नागरिकांना परवडणारे नाही. त्यासाठी नगर पालिकेने काहीही करून खेर्डी येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा करावा अन्यथा नागरिकांचा उद्रेक वाढत जाईल, असा इशारा दिला. या वेळी पाणीपुरवठा अभियंत्यांनी लवकरच खेर्डी येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. या वेळी हर्षदा शेडगे, जान्हवी गुढेकर, अमिता गावडे, यानिका गुढेकर, रूपाली गुढेकर, कविता गुढेकर, संगीता गुढेकर, वर्षा घाडगे, शंकुतला गुढेकर, मीना शेडगे, वैष्णवी साळवी आदी महिला उपस्थित होत्या.